एकूण ८९ लाख रुपये पथदिव्यांची थकबाकी आहे. त्यामुळे गावातील पथदिव्यांची वीज कापण्यात आली आहे, तर सव्वा कोटी रुपये गावातील चौदा ठिकाणी असलेल्या पाणीपुरवठ्याची वीजबिले ग्रामपंचायतीकडे थकलेली आहेत. त्यामुळे शुक्रवारी गावातील नशिराबाद पेठ ३, मुक्तेश्वर नगर २, परमार्थ केंद्र जवळील एक असे तब्बल सहा ठिकाणच्या पाणीपुरवठ्याची वीज कापण्यात आली असल्याची माहिती सहायक अभियंता पवन वाघुळदे यांनी दिली.
गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य ठिकाणचा वीजपुरवठा मात्र सुरळीत सुरू असला तरी गावाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे जलसंकट पाणीटंचाईच्या झळा मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांना बसणार आहेत. आधीच सहा ते सात दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. दरम्यान जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी प्रशासक अर्जुन पाचवणे यांना वीज कंपनीकडे असलेल्या थकबाकीबाबत कठोर पावले उचलावीत व कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार आता ग्रामपंचायत जप्ती व सील ठोकण्याचा पवित्रा हाती घेणार आहे, अशी माहिती प्रशासक अर्जुन पाचवणे यांनी दिली.
लोकमत वृत्ताची दखल
पथदिव्यांचे कनेक्शन तोडले, नसिराबादकर अंधारात या मथळ्याखाली ‘लोकमत’ला वृत्त छापून येताच स्थानिक काही लोकप्रतिनिधींनी ग्रामपंचायत गाठून प्रशासकांशी चर्चा केली. याप्रसंगी मनसेचे तालुकाध्यक्ष मुकुंदा रोटे, प्रदीप साळी, मोहन माळी, फिरदोस सय्यद, रोहित कोलते आदी उपस्थित होते.