येथील द्वारकानगरमध्ये असलेल्या जिल्हा परिषदेच्या मराठी कन्या शाळा नंबर १ मध्ये मुलांचे मुलींचे वर्ग भरतात. या ठिकाणी झालेल्या स्वच्छतागृहाच्या भिंतीला फार मोठ्या भेगा पडल्या आहेत. स्वच्छतागृहाचा दरवाजा तर मोडकळीस आलेला आहे. त्यामुळे त्या स्वच्छतागृहाचा वापर होत नाही.
येथील जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेचे संरक्षण भिंतीचे काम अपूर्णावस्थेत आहे. या ठिकाणी तर स्वच्छतागृह नसल्याने गैरसोय होते. त्यासोबत याठिकाणी पाण्याचीसुद्धा व्यवस्था नाही. शाळा उंचवट्यावर असल्याने ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा तिथपर्यंत वर चढत नाही. नशिराबाद पेठ भागात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत एका शाळा खोलीस पावसाळ्यात तर मोठ्या प्रमाणात गळती लागते. शाळा खोलीच्या भिंतीना मोठ्या प्रमाणावर भेगा पडल्या आहेत. येथेही स्वच्छतागृहाची व्यवस्था खराबच आहे. येथील जिल्हा परिषदेच्या बहुतेक मराठी शाळांमध्ये वीजपुरवठा नाही. तत्काळ दखल घेण्यात यावी, अशी अपेक्षा पालकवर्गातून व्यक्त होत आहे.