रस्त्यांवरील चिखलामुळे ग्रामस्थ बेजार
नशिराबाद : येथील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून अनेकदा ओरड होऊनही त्याकडे नगरपरिषदेकडून दुर्लक्षाचा आहेर दिला जात आहे. त्यातच नवीन विस्तारित भागात तर चिखलामुळे चालणेसुद्धा अवघड झाले आहे. रस्त्यांवर मुरूम टाकण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा १६ सप्टेंबर रोजी नगरपरिषदेसमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा भारतीय जनता युवा मोर्चाचे जळगाव तालुका सरचिटणीस ललित बऱ्हाटे यांनी प्रशासकांना निवेदनाद्वारे दिला आहे. नगरपरिषद कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावातील विस्तारी क्षेत्रातील रस्त्यांची पावसामुळे अत्यंत चाळणी झाली आहे. वाहनचालकापासून ते पायी जाणाऱ्या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नवीन प्लॉट एरिया, द्वारकानगर, मुक्तेश्वरनगर, भवानीनगर, न्यू इंग्लिश स्कूल परिसर, ताजनगर, खाजानगर, पेठभाग, साई समर्थ कॉलनी, दत्तनगर तसेच नव्याने वाढलेल्या वस्त्यांसह गावातील प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने सदर रस्त्याचे खड्डे डांबराने किंवा काँक्रिटीकरणाने बुजवावे. पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण होऊन चिखल झाला आहे. रस्त्यांची दुरुस्ती करण्याबाबत दोन महिन्यांपूर्वीच मागणी करण्यात आली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. ग्रामस्थांचे हाल मोठ्या प्रमाणावर होत आहे. १५ सप्टेंबरपर्यंत याबाबत कुठलीही कारवाई न झाल्यास १६ सप्टेंबर रोजी नगरपरिषद कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे ललित बराटे यांनी दिला आहे.
उघडी आसारी देते अपघाताला आमंत्रण
गावातील प्रमुख रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कॉंक्रिट उघडले आहे. त्यामुळेच लोखंडी आसारी बाहेर आली असून धोकेदायक ठरत आहे. वरची आळी परिसरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात आसारी उघडी पडली आहे. पोलीस स्टेशनजवळ तर मोठ्या प्रमाणावर आसारी बाहेर आल्यामुळे अपघाताला आमंत्रण देत आहे. अनेकदा ओरड होऊनदेखील याबाबत दखल घेतली जात नाही. नगरपरिषददेखील खड्डे व आसारी बुजवण्याचे औदार्य दाखवत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. गावातील सर्वच लोकप्रतिनिधी या मार्गावरून ये-जा करतात. मात्र सर्व जण मौनीबाबा झाल्याचे दिसून येत आहे.