धुळे : मनोरुग्ण महिलेच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणा:या पिंप्री (वडजाई) येथील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत बुधवारी 15 वर्ष सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ही 45 वर्षीय मनोरुग्ण महिला घराबाहेर एकटी झोपलेली असताना गावातीलच नारायण पांडुरंग ठाकरे (30) याने तिच्यावर 7 जानेवारी 2015 रोजी पहाटे लैंगिक अत्याचार केले होते. हा प्रकार मनोरुग्ण महिलेच्या भावजयीने पाहिला होता. तिने हटकल्यानंतर आरोपीने तेथून पळ काढला होता. मोहाडी उपनगर पोलीस ठाण्यात आरोपी नारायण ठाकरेविरुद्ध भादंवि कलम 376 (2) (ल), 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. तपासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक बी.जे. शिंदे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर या खटल्याचे कामकाज जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.पी. कर्णिक यांच्या न्यायालयात चालले. अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील अॅड.पराग एम. पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीला दोषी ठरवले.