जळगाव : मन्याड धरण परिसरात ७ रोजीच्या मध्यरात्री आणि ८ रोजीच्या पहिल्या प्रहरी ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यातच अतिवृष्टीने नांद्रे गावाला पुराचा वेढा पडला आहे. दुसरीकडे जामदा बंधारा ओसांडून वाहत आहे. मन्याड नदी पुढे गिरणा नदीला येऊन मिळत असल्याने गिरणा नदीला मोठा पुर येण्याची स्थिती दिसून येत आहे. काठावरील नागरिकांना सावधानतेचा गिरणा पाटबंधारे विभागाने दिला आहे. घोडेगाव, करजगाव या परिसरात मुसळधार पाऊस झाला. आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह प्रांताधिकारी, तहसिलदार यांनी रात्र जागून काढली. खानदेशातील लोकशाहीर व नगरदेवळा ता. पाचोरा येथील रहिवासी शाहीर शिवाजीराव पाटील यांचे घर पावसामुळे कोसळले आहे.
नांद्रे ग्रामस्थांसाठी रात्र ठरली वैऱ्याची
पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने नांद्रे ता. चाळीसगाव येथील ग्रामस्थांसाठी मंगळवारची रात्र वैऱ्याची ठरली. संपूर्ण गावांला पुराने वेढा दिल्याने अनेकांची गुरे, पत्र्याचे शेड, इलेक्ट्रिक पोल, ट्रान्सफॉर्मरसह विज तारा वाहून गेल्या तर काही शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशी, मका, पपई पिक वाहुन गेले. ५० वर्षात असा पूर पाहिला नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याशिवाय गणेशपूर व पिंप्री परिसरात कालपासून संततधार पाऊस सुरू आहे. ओढरे, चितेगाव, उंबरहोळ येथील लघु व मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत डोंगरी व तितूर नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे तर दुसरीकडे काही गावांमध्ये पाणी घुसल्यामूळे संपर्क तुटला होता.