जळगाव : प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत जिल्हाभरात १ ते ७ सप्टेंबर दरम्यान मातृवंदना सप्ताह राबविला जाणार असून या सप्ताहात विविध कार्यक्रमांची आखणी जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे. यात पहिल्या अपत्यासाठी मातांना तीन टप्प्यांमध्ये ५ हजार रुपयांची मदत मिळणार आहे. यात गरोदर महिलांना कोविड लसीकरण करून घेण्यावरही भर दिला जाणार आहे.
शासकीय सेवेत असणाऱ्या माता वगळून सर्वांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी पहिल्या अपत्यासाठी ही मदत मिळणार असल्याने गरोदर महिलांनी तातडीने नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी या सप्ताहात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या सप्ताहात या कार्यक्रमाची जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात हस्तपत्रके वाटप करणे, ग्रामसभांमध्ये माहिती देणे, प्रभात फेरीतून माहिती देणे, पात्र लाभार्थ्यांची माहिती संकलित करण्यासाठी घरोघरी जाऊन नोंदणी करणे, आधार कार्ड आदी समस्यांच्या निराकरणासाठी बैठका घेणे असे विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत.
तीन टप्प्यात मिळणार पैसे
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत पहिल्या अपत्यासाठी मातांना त्यांच्या बँक खात्यावर थेट पाच हजारांची मदत जाणार आहे. ही रक्कम त्यांना तीन टप्प्यात मिळणार आहे.
पहिला हप्ता १ हजार रुपयांचा असून दुसरा व तिसरा हप्ता हा प्रत्येकी २ हजार रुपयांचा राहणार आहे.
पात्रतेचे निकष काय?
शासकीय सेवेत असलेल्या माता वगळून सर्वांना पहिल्या अपत्यासाठी हा लाभ मिळणार आहे. त्यासाठी गरोदर महिलेचे, पतीचे आधार कार्ड हवे, मातेचे आधार संलग्न बँकेचे खाते, गरोदपणाची शासकीय यंत्रणेत नोंद, गरोदरपणानंतर तपासणी, बाळाचा जन्मनोंदणी दाखल, माता व बाळाचे लसीकरण या बाबी पूर्ण केल्यानंतर हा लाभ मिळणार आहे.
लाभासाठी कोठे करायचा संपर्क
गरोदार महिलांनी जवळच्या शासकीय यंत्रणेत आधी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी जवळच्या आरोग्य केंद्र किंवा शासकीय रुग्णालयात जावे.
१ ते ७ सप्टेंबर दरम्यान, मातृवंदना सप्ताह जिल्ह्यात राबविला जात आहे. सप्ताहात जनजागृतीसह विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. महिलांनी गरोदरपणात तातडीने शासकीय यंत्रणेत नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार तीन टप्प्यात पहिल्या अपत्यासाठी त्यांना पाच हजारांची मदत मिळणार आहे. - डॉ. समाधान वाघ, माता व बालसंगोपन अधिकारी