फुले मार्केटमधील सहा दुकाने सील : मनपा उपायुक्तांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने गेल्या महिन्याभरापासून जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक दुकाने वगळता इतर दुकाने उघडण्यास बंदी घातली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकानांना देखील सकाळी अकरा वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेतील दुकानदार आता नियमांची पायमल्ली करताना आढळून येत आहेत. बुधवारी शहरातील फुले मार्केटमधील दुकानांमध्ये तब्बल ४० पेक्षा अधिक ग्राहक आढळून आल्याने मनपा उपायुक्तांनी या मार्केटमध्ये सहा दुकाने सील केली आहेत.
अत्यावश्यक सेवेतील किराणा, दूध विक्री, बेकरी, मेडिकल अशा दुकानांना व्यवसाय करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र, व्यवसाय करताना नियमांची पायमल्ली होणार नाही याबाबतच्या सूचना देखील या दुकानदारांना देण्यात आल्या आहेत. मात्र, संधीचा गैरफायदा शहरातील अनेक दुकानदारांकडून घेतला जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शहरातील फुले मार्केटमधील काही किराणा दुकानांमध्ये बुधवारी ४० पेक्षाही अधिक ग्राहक आढळून आले. याबाबत शहर पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी व्हिडिओ छायाचित्रण करून याबाबतची माहिती मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांना दिली. ही माहिती मिळताच सकाळी आठ वाजता मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक फुले मार्केटमध्ये पोहोचले. मनपाचे पथक पोहोचल्यानंतर दुकानांसमोर असलेल्या ग्राहकांनी देखील पळ काढायला सुरुवात केली. मात्र, गर्दीचे व्हिडिओ चित्रण झाल्यामुळे मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी थेट दुकानदारांवर कारवाईला सुरुवात केली. यामध्ये फुले मार्केटमधील ४, तर दाणाबाजार परिसरातील २ अशी ६ दुकाने सील करण्यात आली आहेत.
लॉकडाऊन असेपर्यंत बंद राहतील दुकाने
मनपाने बुधवारी कारवाई केलेल्या अत्यावश्यक सेवेतील सहाही दुकानदारांना नोटीस बजावण्यात आली असून, जोपर्यंत प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू राहतील, तोपर्यंत कारवाई करण्यात आलेली सर्व दुकाने बंद राहतील, अशा सूचना मनपा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. जरी ही दुकाने अत्यावश्यक सेवेत मोडत असली, तरी नियमांची पायमल्ली केल्यामुळे आता ही दुकाने बंद ठेवावी लागतील, अशाही सूचना मनपा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. यासह प्रत्येक दुकानदाराला प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंडदेखील ठोठावण्यात आला आहे.