जळगाव : कोरोनापूर्वी पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर तीन ते चार दिवसातच नागरिकांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी तारीख दिली जात होती. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर १० ते १२ दिवसांनी नागरिकांना पासपोर्ट मिळत होता. मात्र, आता अनलॉकनंतरही पासपोर्ट प्रशासनातर्फे कोरोनाचे कारण सांगून, नागरिकांना पासपोर्टसाठी कागदपत्रांच्या पडताळणीकरिता महिनाभराने तारीख देण्यात येत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे परिणामी नागरिकांच्या हातात पासपोर्टही विलंबाने मिळत आहे.
केंद्र शासनाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे डाक विभागाच्या माध्यमातून जळगावला मे २०१८ पासून पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात आले आहे. जळगावला कार्यालय झाल्यामुळे, येथील नागरिकांचा नाशिक व मुंबईला जाण्याचा त्रास मोठ्या प्रमाणावर वाचला आहे. जळगावला पासपोर्ट कार्यालय झाल्यामुळे नागरिकांना तत्काळ पासपोर्ट मिळणे सोपे झाले आहे. नागरिकांनी पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर, पासपोर्ट प्रशासनातर्फे लागलीच तीन ते चार दिवसातच नागरिकांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी बोलाविण्यात येते होते. यासाठी तहसील कार्यालयाशेजारी असलेल्या पासपोर्ट कार्यालयात सकाळपासूनच नागरिकांची कागदपत्रांच्या पडताळणीसाठी गर्दी व्हायची. पडताळणीनंतर नागरिकांना १५ दिवसांपर्यंत घरपोच पासपोर्ट पाठविण्यात येत होते.
इन्फो :
कोरोनामुळे मिळतेय महिना भरानंतर तारीख
जळगावला पासपोर्टचे कार्यालय झाल्यामुळे नागरिकांची नाशिक, मुंबईला जाण्याची वणवण थांबली असून, पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर नागरिकांना अवघ्या दहा ते बारा दिवसात पासपोर्ट मिळत होता. या सुविधेमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत होते. मात्र, आता कोरोनामुळे पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर, नागरिकांना थेट महिनाभरानंतरची तारीख देण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जून व जुलै महिन्यात पासपोर्टसाठी अर्ज केलेल्या नागरिकांना ऑगस्टमध्ये कागदपत्रांच्या पडताळणीची तारीख देण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
इन्फो :
सध्या ३० टक्केच नागरिकांच्या कागदपत्रांची पडताळणी
कोरोनापूर्वी पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर तीन ते चार दिवसात कागदपत्रांच्या पडताळणीची तारीख मिळायची आणि दिवसभरात ८० ते १०० नागरिकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जायची. मात्र, आता कोरोनामुळे महिना ते दीड महिन्यानंतर नागरिकांना तारीख मिळत असून, सध्या दररोज २० ते २५ नागरिकांच्याच कागदपत्रांची पडताळणी होत आहे. परिणामी त्यामुळे नागरिकांनाही पासपोर्ट हातात मिळण्यास विलंब होत आहे. या ‘लोकमत’ प्रतिनिधीने पासपोर्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, त्यांनी मुंबई येथील पासपोर्टच्या मुख्य कार्यालयाकडूनच नागरिकांना अर्ज केल्यानंतर ऑगस्ट महिन्यापर्यंत तारीख देण्यात येत आहे. तसेच त्यांच्या सूचनेनुसार सध्या दररोज २० ते २५ नागरिकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या सर्व प्रकारामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय होत असून, पूर्वीप्रमाणे कागदपत्रांच्या पडताळणीची तीन ते चार दिवसात मिळण्याची मागणी नागरिकांमधून पासपोर्ट कार्यालयाकडे करण्यात येत आहे.