वरखेडी, ता. पाचोरा : निम्मे बटाईने घेतलेल्या शेतीत रानडुकरे घुसल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
वरखेडी खुर्द शेतशिवारात अनेक स्वप्ने उराशी बाळगून रमेश नामदेव चौधरी (लासुरे) यांची ८२ गुंठे शेती लासुरे येथील अनिल तुळशीराम देवरे यांनी निम्मे बटाईने केली आहे. यामध्ये त्यांनी पाच बॅग मका लागवड केली आहे. यासाठी त्यांना जमीन मशागतीपासून बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके, मजुरी खर्च मिळून आजवर ५० हजार रुपये खर्च झाला आहे. त्यात त्यांना सुरुवातीला पावसाच्या अनियमिततेचा फटका बसला. तसेच उशिरा आलेल्या पावसाने मक्याचे पीक मात्र चांगलेच बहरले. त्यामुळे शेतकरी अनिल देवरे हे येणाऱ्या उत्पन्नाचे साधक आराखडे आखत असतानाच परिपक्वतेकडे वाटचाल करणाऱ्या व ९० ते ९५ क्विंटलचे उत्पन्न दृष्टीक्षेपात असताना त्यांच्या मका पिकावर रानडुकरांनी हल्ला चढवून मक्याचे पीक अक्षरश: आडवे पाडून फस्त केले. तसेच मोठ्या प्रमाणात नुकसान करून संबंधित शेतकऱ्याचे स्वप्न धुळीस मिळविले.
शेतकऱ्याचे संपूर्ण आर्थिक नियोजन कोलमडल्याने अनिल देवरे हे खूपच हतबल झाले आहेत. भविष्यात शेतीच करू नये, इथवर नकारात्मक विचार त्यांच्या मनात येऊ लागले असून वनविभागाने नुकसानभरपाई देऊन त्यांना मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा आहे. त्यादृष्टीने त्यांनी सर्व कागदपत्रांची त्यांनी पूर्तता करून संबंधित प्रादेशिक वनविभागाकडे ऑनलाईन पाठविले आहेत.
250821\4.jpg
रानडुकरांनी मका फस्त केल्याने शेतक-याचे लाखोचे नुकसान,आर्थिक स्वप्न भंगले शेतकरी हताश.रानडुकरांनी आडवा पाडलेला मका