जळगाव : मेहरुण परिसरात मंगळवारी रात्री दीड वाजता कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान एमआयडीसी पोलिसांनी संशयास्पदरित्या फिरणाऱ्या विशाल किशोर मराठे (२१, रा. विश्वकर्मा नगर, रामेश्वर कॉलनी) या संशयिताला अटक केली आहे. संशयित विशाल मराठे याच्यावर यापूर्वी दोन घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
एमआयडीसी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, किशोर पाटील, सुधीर साळेव, गोविंदा पाटील, मंदार पाटील, साईनाथ मुंढे यांचे पथक मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास मेहरुण परिसरात कोम्बिंग ऑपरेशन करत होते. यादरम्यान महादेव मंदिराजवळ संशयित विशाल मराठे संशयास्पदरित्या फिरताना सापडला. त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. चोरी अथवा घरफोडी करण्याच्या हेतूने तो फिरत असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राकेश बच्छाव यांच्या फिर्यादीनुसार संशयित विशाल मराठे याच्याविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.