शुक्रवारीदेखील २६ गाळेधारकांचे खाते सील केले : गाळेधाकांचीही लवकरच ठरणार भूमिका
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांचे बँक खाते सील करण्याची कारवाई मनपा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. त्याविरोधात आता गाळेधारकदेखील आक्रमक झाले असून, मनपाच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात गाळेधारक शनिवारी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. तसेच गाळेधारकांच्या प्रश्नावर कायमचा तोडगा काढण्याची मागणी यावेळी केली जाणार असल्याची माहिती गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे यांनी ‘लोकमत’ला दिली.
मनपा प्रशासनाने आता गाळेधारकांकडे असलेली अनेक वर्षांपासूनची थकीत रक्कम वसूल करण्यासाठी थेट गाळेधारकांचे बँक खाते सील करण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी ५० हून अधिक गाळेधारकांचे खाते सील केल्यानंतर, शुक्रवारीदेखील मनपा प्रशासनाने २६ गाळेधारकांचे खाते सील केले आहे. एकीकडे मनपाने कारवाई सुरू केली असताना, दुसरीकडे आता गाळेधारकदेखील आक्रमकपणे आपली भूमिका शासनासमोर मांडण्याची तयारी करत आहेत. गाळे प्रश्न येणाऱ्या काळात पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
मोठे थकबाकीदार रडारवर
मनपा प्रशासनाने गुरुवारी व शुक्रवारी ज्या गाळेधारकांचे बँक खाते सील केले आहे. त्यामध्ये मनपाचे मोठे थकबाकीदार असल्याची माहिती मनपाकडून देण्यात आली आहे. ज्या गाळेधारकांकडे जास्त थकबाकी आहे. तसेच ज्यांनी मनपाची थकबाकी कधीही भरली नाही असे गाळेधारक मनपाच्या रडारवर राहणार आहेत. त्यानंतर ज्यांनी निम्मे रक्कम भरली आहे अशा गाळेधारकांचे खाते सील करण्यात येणार आहेत. येत्या आठवडाभरात मनपाकडून ही कार्यवाही पूर्ण होण्याची शक्यता आहे.
कारवाई झाल्यास आंदोलन अटळ : गाळेधारकांची भूमिका
अव्यावसायिक मार्केटमधील गाळेधारकांना मनपाने बजावलेले बिले अवाजवी असल्याने गाळेधारकांनी भाड्याची रक्कम न भरण्यावर गाळेधारक ठाम आहेत. जोपर्यंत शासनाकडून योग्य धोरण निश्चित होत नाही तोपर्यंत मनपाने गाळे कारवाई करू नये, अशी भूमिका गाळेधारकांनी घेतली आहे. तसेच मनपाने कारवाई केली तर गाळेधारक तीव्र आंदोलन करतील, अशी भूमिका गाळेधारकांनी घेतली आहे.
भाडे नाही भरले नाही तर कारवाई अटळ - मनपाची भूमिका
एकीकडे गाळेधारक थकीत भाड्याची रक्कम न भरण्यावर ठाम आहेत. तर दुसरीकडे आता मनपा प्रशासन थकीत भाडे वसूल करण्यावर ठाम आहे. त्यामुळे मनपाने आता गाळेधारकांचे बँक खाते सील करण्याची कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, गाळेधारकांना मनपाने थकीत भाड्यापोटी संपूर्ण ९ वर्षांची बिले दिली असून, गाळेधारकांनी भाडे भरले नाही तर कारवाई अटळ असल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.