एसटी महामंडळाच्या जळगाव आगारातील बस स्थानकात महामंडळ प्रशासनाने करारनाम्यानुसार विक्रेत्यांना व्यावसाय करण्याची परवानगी दिली आहे. तसेच महामंडळाने सांगितलेल्या वस्तूच विक्री करण्याचीदेखील परवानगी दिली आहे. मात्र, असे असताना काही विक्रेते हे करार नाम्यातील अटी-शर्तीनुसार वस्तू न विकता इतरही जनरल-कटलरी मालाच्या वस्तूही विक्री करत असल्याचे महामंडळाच्या निदर्शनास आले होते. त्यानुसार विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा यांनी सोमवारी दुपारी या विक्रेत्यांच्या मालाची तपासणी करून, परवानगी नसलेल्या खाद्य पदार्थांच्या वस्तू जप्त केल्या आहेत. तसेच या विक्रेत्यांकडून प्रत्येकी एक हजारांचा दंडही वसूल केला आहे.
इन्फो :
...तर परवाने रद्द करण्याच्या नोटिसा
विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांनी या विक्रेत्यांचे साहित्य जप्त केल्यानंतर, त्यांच्याकडून एक हजार रुपयांचा दंडही वसूल केला आहे. तसेच या पुढे अशा प्रकारच्या वस्तू विक्री करताना आढळल्यास, थेट परवाने रद्द करण्यात येतील. अशा प्रकारच्या नोटिसाही बजावण्यात आल्या असल्याचे दिलीप बंजारा यांनी सांगितले.