जळगाव : हुंड्याच्या पैशांसाठी कोमल धीरज शिंदे (२७,रा.शामराव नगर, जळगाव) या विवाहितेला सासरच्यांकडून मारहाण व शिवीगाळ करून सतत छळ केला जात असल्याने पतीसह सात जणांविरुध्द शुक्रवारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पती धीरज रंगराव शिंदे, सासरे रंगराव पंडित शिंदे, सासू सुगंधा रंगराव शिंदे, संध्या लक्ष्मीकांत बोरसे, लक्ष्मीकांत बन्सीलाल बोरसे, शीतल गणेश वाघ व गणेश विलासराव वाघ (सर्व रा.नाशिक) यांचा त्यात समावेश आहे.
फटाके फोडणाऱ्या बुलेटवर कारवाईची मागणी
जळगाव : शहरात वेगाने बुलेट चालवून सायलन्सरद्वारे फटाके फोडणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याची मागणी शहरातील त्रस्त नागरिकांनी पोलीस अधीक्षकांकडे निवदेनद्वारे केली आहे. त्याशिवाय वाहनांवर विचित्र नंबर असल्याने अपघाताच्यावेळी हे वाहन निष्पन्न होत नाही, त्यामुळे अशा वाहनधारकांवरही कारवाई करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
ॲड.विद्या राजपूत खून खटल्यात १६ जणांच्या साक्षी
जळगाव : जळगाव प्रथम वर्ग न्यायालयातील सरकारी वकील विद्या उर्फ रेखा भरत राजपूत (पाटील) यांच्या खून खटल्यात आतापर्यंत सरकार पक्षाने १६ जणांच्या साक्ष नोंदविल्या आहेत. १ मार्च रोजी शवविच्छेदन करणारे डॉक्टर व तपासाधिकारी यांची साक्ष घेतली जाणार आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश पी.वाय. लाडेकर यांच्या न्यायालयात हा खटला सुरू आहे.
दरोडा प्रकरणाचा तपास थंडावला
जळगाव : द्रौपदी नगरात पिंटू बंडू इटकरे यांच्याकडे तसेच खेडी येथे झालेल्या दरोडा प्रकरणात अद्यापर्यंत कोणतेच धागेदोरे पोलिसांना मिळालेले नाहीत. द्रौपदी नगरातील दरोड्याला ३ रोजी एक महिना पूर्ण होईल तर खेडी येथील दरोड्याला पंधरा दिवसांच्यावर कालावधी झाला. सर्वच बाजुंनी तपास करण्यात आला, मात्र कुठलीच माहिती पोलिसांना मिळू शकली नाही.
‘त्या’ कर्मचाऱ्याविरुध्द अहवाल
जळगाव : कोविड सेंटरमध्ये दाखल असतानाही वॉइन शॉपवर जाऊन मद्य खरेदी करणाऱ्या आरटीओतील त्या कर्मचाऱ्याविरुध्द अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे अहवाल पाठविला आहे. गुरुवारी सायंकाळी हा कर्मचारी कोविड सेंटरमधून दुचाकीने गणेश कॉलनीतील वाईन शॉपवर गेला होता. शुक्रवारी आरटीओ कार्यालयात ‘लोकमत’च्या वृत्ताची दिवसभर चर्चा होती.