भुसावळ : शहरात बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ ४० ते ५० मीटर अंतरावर असलेल्या जळगाव जनता बँकेलगत लावलेल्या दुचाकीच्या डिकीत ठेवलेले ८० हजार रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केले. या घटनेत ‘नजर हटी, दुर्घटना घटी’चा प्रत्यय मानकरे दाम्पत्याला आला. अवघ्या दोन मिनिटांत चोरट्यांनी ही रक्कम लांबविली.
शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या या घटनेबाबत माहिती अशी की, शांताराम विठ्ठल मानकरे (रा. तुकाराम नगर भुसावळ) हे दुचाकीवरून (एमएच -१९- सीएच ९४४८) पत्नी कुमुदिनी मानकरे यांच्या सोबत शुक्रवारी दुपारी जेडीसीसी बँकेत आले आले होते. प्लाॅट खरेदीसाठी रक्कम लागत असल्याने या दाम्पत्याने खात्यातून ८० हजारांची रोकड काढली व ही रोकड कागदपत्रे असलेल्या एका बॅगेत ठेवली व ही बॅग जळगाव जनता बँकेच्या बाहेर लावलेल्या त्यांच्या दुचाकीच्या डिकीत ठेवली. जळगाव जनता बँकेत त्यांचे खाते असल्यामुळे पॅन कार्ड खात्याशी लिंक करण्यासाठी दाम्पत्य बँकेत शिरताच चोरट्यांनी दुचाकीच्या डिकीतून कागदपत्रे व रोकड असलेली बॅग लांबवली. अवघ्या दोन मिनिटांत ‘नजर हटी, दुर्घटना घटी’चा प्रत्यय मानकरे दाम्पत्याला आला. याबाबत मानकरे यांनी बाजारपेठ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक दिलीप भागवत व सहकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली तसेच बँकेच्या परिसरातील असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. लांबविलेल्या बॅगेत धनादेश, पासबुकसह ८० हजारांची रोकड होती. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.