जळगाव : काँग्रेसमधील प्रा.व्ही.जी. पाटील गट व डॉ.जी.एन. पाटील गटातील वाद पुन्हा उफाळून आला असून काँग्रेस भवनात जिल्हाध्यक्षांचा आदेश डावलत एनएसयुआयला दिलेली केबीन कुलूप तोडून ताब्यात घेतल्याचा प्रकार सोमवारी दुपारी घडला.
युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष व विद्यमान ब्लॉक अध्यक्ष मानसिंग सोनवणे यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) अँड. संदीप पाटील यांनी त्यांची केबीन एनएसयुआयला दिली. त्यानुसार एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी तिचा ताबा घेत त्यावर फलकही लावला.
मात्र पूर्वी ही केबिन तत्कालीन युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड. अविनाश भालेराव यांची होती. त्यांनी ती सोनवणे यांना दिली होती. त्यामुळे अँड. भालेराव हे सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास काँग्रेस भवनात आले. त्यांनी कुलूप तोडून केबीनचा ताबा घेतला. तेथे लावलेली एनएसयुआयची पाटीदेखील काढून टाकली. दारावर ऑईल पेंटने अँड. भालेराव यांचे नाव टाकून घेतले.
या प्रकारामुळे काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा उफाळून आली असल्याचे दिसून आले.
------------
या प्रकाराबाबत एनएसयुआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी हा जिल्हाध्यक्षांच्या आदेशाचा अवमान असून हा प्रकार करणार्यांना पक्षातून निलंबित करावे, अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे. केबीन आपलीच.. ही केबीन आपलीच होती. त्यामुळे कुलूप तोडण्याचा प्रश्नच येत नाही. आपणावर केला जाणारा आरोप खोटा आहे. -अविनाश भालेराव