लोकमत न्यूज नेटवक
जळगाव : सुनील झंवर याच्या साई मार्केटींगकडे शालेय पोषण आहाराचा ठेका असताना झालेल्या गैरव्यवहारात चौकशी समितीने ठपका ठेवूनही गेल्या दीड वर्षापासून कारवाईचा विसर पडल्याचे चित्र आहे. दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल व्हावा, या मागणीसाठी माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र शिंदे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांची भेट घेतली. मात्र, आपण संचालकांना पत्र दिल्याचे सीईओंनी सांगितले.
धान्यादी माल न देता बिले अदा करण्यात आल्याच्या प्रकरणात बनावट शिक्के,पावत्यांचा वापर करून साई मार्केटींगला देयके अदा करण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणात नियुक्ती चौकशी समितीने दिलेल्या अहवालानुसार ऑगस्ट २०१८ मध्ये कारवाई करण्यासंदर्भात शिक्षण संचालकांना पत्र देण्यात आले होते. त्यानुसार फेब्रवारीमध्ये शिक्षण विभागाकडून यासंबधित दप्तर मागविण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही. दरम्यान, स्थानिक पातळ्यांवर ठोस कारवाई नसल्याचा मुद्दा रवींद्र शिंदे यांनी सीईओ आणि शिक्षणाधिकारी यांच्याकडे मांडला. यात पोषण आहार अधीक्षक, मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी यांना दोषी धरण्यात आले आहे. मात्र, त्यांना केवळ नोटीसा देऊन खुलासे मागविण्याची कारवाई शिक्षण विभागाने केली असून पुढील कारवाईचा अधिकाऱ्यांना विसरच पडल्याचा मुद्दा समोर आला आहे.