आधी या तिन्ही लोकी ङोंडा फडकावून झाला, की मग आणखी तीन लोक वाट बघतात- यू.एस., यु.के. आणि जर्मनी! इथेही ङोंडा फडकणे अत्यावश्यक आहे. नाहीतर आधीचे ङोंडे काय कामाचे? सावरकर म्हणाले होते- ‘‘जरी उद्धरणी व्ययन तिच्या हो साचा! हा व्यर्थ भार विद्येचा..’ आम्ही आता म्हणतो की, अमेरिकेला जायचा कामी येत नसेल तर ‘व्यर्थ भार विद्येचा’! इथे ‘इस्त्रो’ एका पाठोपाठ एक विक्रम करत असेल, पण आमच्या मुलांची खरी महत्त्वाकांक्षा असते ती ‘नासा’मध्ये जाण्याचीच. या प्रवासात सामील होण्यासाठी आमचे ‘पुत्र’ हुशार असणं अनिवार्य आहे. नुसते हुशार नाही.. प्रचंड हुशार.. बक्कळ हुशार. खूप हुशारी म्हणजे खूप मार्क, खूप मार्क म्हणजे हवी तिथे अॅडमिशन, म्हणजे खात्रीची प्लेसमेंट, म्हणजे ‘ऑसम पॅकेज. म्हणजे?’ अमेरिका!!
हा सर्व भावी प्रवास लक्षात घेता मुलांनी हुशार असणं जवळजवळ बंधनकारक आहे. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्या ‘मेंदू’ या एकाच अवयवाची काळजी घेतली जाते. लांबच्या प्रवासाला जाताना ‘सॉफ्ट लगेज’ प्रकारातली बॅग कशी दाबून दडपून भरतात. तसं या मुलांच्या मेंदूत ज्ञान कोंबलं जातं. अगदी लहानपणापासूनच त्याच्या मनावर हे सतत बिंबवल जातं की ‘तू सतत, सगळीकडे टॉपला राहिलंच पाहिजे! आपल्या बुद्धीची इतिकर्तव्यता ही परदेशी स्थायिक होण्यात आहे, अशी या मुलांची पक्की खात्री असते. त्यापेक्षा वेगळा काही विचार ते करूच शकत नाहीत आणि कुणी केलाच तर तो पालकांनाच पटत नाही. आपल्या मुलाने ‘यशस्वी’ जीवन जगावं हीच आपली इच्छा असते- ‘समृद्ध’ जीवन जगावं. ही इच्छा सुद्धा नसते कुणाची. साहजिकच यशासाठी काय वाट्टेल ते! हा मुलांचा मूलमंत्र होतो. यशाच्या आड येणारी कोणतीही गोष्ट अथवा व्यक्ती त्यांना नकोशी असते. निसर्गक्रमानुसार आई-बाप म्हातारे झाले की, तेही यशाच्या आड येऊ लागतात. त्यांचं वय, एकटेपणा, त्यांची आजारपणं, त्यांचं परावलंबी जीवन. हे सगळंच मग या ‘हुशार’ मुलांना लोढणं वाटायला लागतं; आणि त्याची जाणीव ते आई-बापांना व्यवस्थित करून देतात. त्यांचा तुसडेपणा, दुर्लक्ष-सगळं काही लक्षात येऊनही आई-बाप गप्प बसतात. शेवटी, त्यांनीच घडवलेली हुशार मुलं असतात ना ती! कधीतरी मग अशा हुशार मुलांचे आई-बाप देवाला विनवतात ..
विठ्ठला.. मायबापा
एक मागणं माझं पण ऐका-
चमत्कारिक वाटेल जरा.. इतरांना
पण तुला नाही, जगत्पालका.
अडाणी मुलं कुठेशी मिळतील
जरा सांगशील का?
हो.. अडाणी. तेच म्हणायचंय मला.
- अॅड.सुशील अत्रे