प्रत्येक गावनिहाय कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी आशा स्वयंसेविका व स्वयंसेवक १६ दिवस घरोघरी जाऊन घरातील सर्व सदस्यांच्या तपासणीत फिक्कट लालसर न खाजवणारा तसेच न दुखणाऱ्या बधीर चट्ट्याचे निरीक्षण करणार आहेत. पर्यवेक्षक या मोहिमेवर देखरेख ठेवणार असून, बाधित रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण रुग्णालयात मोफत निदान व उपचार करण्यात येणार आहेत.
त्वचारोग व कुष्ठरोगावर वेळीच उपचार घेतल्यास तो बरा होत असल्यामुळे समाजामध्ये या रोगाविषयी असलेले गैरसमज बाजूला सारून संशयित रुग्णांनी या मोहिमेचा लाभ घेत तात्काळ निदान व उपचार घेतल्यास रोगप्रसाराला आळा बसू शकेल. तालुक्यातून अशा रोगांना हद्दपार करण्यासाठी सर्व नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे यांनी केले आहे.
साकळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्यसेवक राजेश्वर निकुंभ, आरोग्यसेविका सविता कोळी, गटप्रर्वतक चित्रा जावळे, स्वयंसेविका रंजना कोळी, स्वयंसेवक गोकुळ कोळी परिश्रम घेत आहे.