भीतीचे वातावरण : शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करावा
कासोदा : भडगाव तालुक्यातील कासोदा रस्त्यावर बिबट्याचे बछड्यांसह दर्शन झाल्याने या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. रात्री होणारा वीजपुरवठा दिवसा करावा, अशी मागणी होत आहे. १ रोजी भडगाव तालुक्यातील कासोदा रस्त्यावर एका फार्मजवळ बछड्यांसह बिबट्या दिसला होता. या बिबट्याचा वावर कधी व कोणत्या दिशेला होईल, याचा नेम नाही त्यामुळे शेतकरी व मजूर रात्री शेतात जायला धजावत नाहीत. रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत, खरिपाचा हंगाम अतिपावसामुळे वाया गेला आहे, जो थोडाफार आला त्याला भाव नाही; पण जास्त पावसाचा फायदा करून घ्यावा या उद्देशाने मागचे विसरून बळीराजा उभारी घेऊन रब्बीकडे वळला आहे. परंतु रात्रीच्या विजेमुळे त्याला जीव संकटात टाकून शेतात रात्र काढावी लागत आहे, तो कुटुंबासाठी काहीही करायला तयार आहे; परंतु या बिबट्याच्या दहशतीमुळे घरातील सदस्य बाबांना रात्री शेतात जाऊ नका, अशा विनवण्या करीत आहेत. कारण तोच कुटुंबातील खरा आधार आहे. कधी वीज पडून तर कधी साप-विंचवाचा धाक, आता तर परिसरात बिबट्या वावरत असल्याने मृत्यूला सामोरे जाण्यासारखा हा प्रकार आहे. एकदा जीव गेल्यानंतर शासनाने किती रुपयांची मदत केली तरी तो आधार हरवलेला असतो. यासाठी एरंडोलच्या वीज कार्यालयाने संपूर्ण एरंडोल तालुक्यात दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी वाढली आहे. शेतकऱ्यांच्या या रास्त मागणीचा विचार व्हावा अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा सामूहिकरीत्या शेतकऱ्यांनी दिला आहे.