दोन शेळ्या व एका मेंढीची शिकार : शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये घबराट
भुसावळ : शहराजवळील साकेगाव फॉरेस्ट हद्दीत गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असून, बिबट्याने गावातील भिल समाज बांधवांच्या दोन शेळ्या तसेच एका मेंढीची शिकार केली आहे. यामुळे शेतकऱ्यांसह या भागाचा वापर करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
साकेगाव पुढे जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारा रस्ता व फॉरेस्ट हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांपासून नीलगायीसह बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास येत आहे. या वन्यप्राण्यांचे ग्रामस्थांना दर्शनही झालेले आहे. गेल्या दोन दिवसात बिबट्याने गावातील शेळी मेंढीपालनाचा व्यवसाय करणारे भिल समाज बांधवांच्या दोन शेळ्या तसेच एका मेंढीची शिकार केली आहे. यामुळे गुरे चारणारे यांच्यासह शेतकरी व या भागात वावर करणाऱ्यांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण दिसून येत आहे.
शेती करणे झाले अवघड
वनहद्दीला लागून साकेगावकरांसह जोगलखेडा, भानखेडा या गावातील शेतकरी बांधवांच्या मोठ्या प्रमाणात शेतजमिनी आहेत. सध्या रब्बी हंगाम सुरू असून शेतकऱ्यांनी शेतात गहू, हरभरा पिकाची लागवड केलेली आहे. रात्रीच्या वेळेस पिकांना पाणी देण्यासाठी काही शेतकरी मुक्कामी शेतात थांबतात तर काही शेतकरी दिवसा काम आटोपून घराकडची वाट धरतात. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून बिबट्याने शेळ्या मेंढ्यांची शिकार केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
दरम्यान, याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वनपरिमंडळ अधिकारी पी. एम.महाजन, वनरक्षक विलास काळे, संदीप चौधरी तसेच वनसेवक विलास पाटील व तुषार भोळे या टीमने वनहद्दीत पाहणी केली. काही प्राण्यांचे पायाचे अस्पष्ट ठसे असल्यामुळे नेमका कोणता प्राणी आहे याबाबत निकष लावणे कठीण असल्याचे वन अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
शेतकऱ्यांनी सतर्क राहावे
फॉरेस्ट शिवारामध्ये शेतीकामासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतात जाताना सावध व सतर्क रहावे. हातात काठी असावी. एकट्याने जाऊ नये. रात्रीच्या वेळेस टॉर्चचा वापर करावा. याशिवाय मोबाईलच्या गाण्याचा आवाज वाढविल्यास वन्यप्राणी जवळ येत नाही. तसेच रात्री जर शेतात मुक्काम असला तर शेकोटी करावी. आगीमुळे वन्यप्राणी जवळ येत नाही. यापुढे बिबट्याचे किंवा इतर हिंस्र प्राण्याचे दर्शन झाल्यास त्वरित वनविभागाला कळवावे, असे वनरक्षक विलास काळे यांनी सांगितले.
===Photopath===
021220\02jal_4_02122020_12.jpg
===Caption===
फॉरेस्ट हद्दीत बिबट्याने अशाप्रकारे शेळीचा फडशा पाडला.