जळगाव : चोपडा येथील विमान अपघातात जखमी महिला पायलटला वाचविण्यासाठी रुग्णवाहिका व स्ट्रेचर उपलब्ध व्हायला होणाऱ्या अडचणी लक्षात घेता अंगावरची साडी सोडून त्याची झोळी तयार केली व पायलटला जंगलातून बाहेर काढून रुग्णवाहिकेपर्यंत नेणाऱ्या विमलाबाई हिरामण भिल (वय ६१, रा. वर्डी, ता. चोपडा) या वृद्धेच्या कार्याची जिल्हा पोलीस दलाने दखल घेतली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी विमलाबाई यांचा साडीचोळी तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
चोपडा तालुक्यातील सातपुड्याच्या जंगलात १६ जुलै रोजी शिरपूर येथील संस्थेचे विमान कोसळून पायलट कॅप्टन नुरुल अमीन हे ठार, तर शिकावू पायलट अंशिका लखन गुजर गंभीर जखमी झाली होती. घनदाट जंगल असल्याने तेथे वाहन जाऊ शकत नव्हते. शक्य तितक्या लवकर अंशिकाला बाहेर काढणे अत्यंत गरजेचे होते, अन्यथा प्रचंड रक्तस्रावामुळे जीव जाण्याचाही धोका होता. शेतात काम करीत असलेल्या विमलाबाई या देखील घटनास्थळावर पोहोचल्या होत्या. जमलेल्या लोकांच्या तोंडून पडणारे हे वाक्य तेथे धावून आलेल्या विमलाबाई यांच्या कानावर पडले. अशिक्षित असतानाही त्यांनी प्रसंगावधान दाखवून स्ट्रेचर नाही म्हणून काय झालं म्हणत चारजणांना तयार करून स्वत:च्या अंगावरची साडी सोडली अन् त्या बांबूच्या झोळीला जोड देत अंशिकाला टाकून तीन कि.मी. अंतरावर असलेल्या रुग्णवाहिकेपर्यंत नेले. त्यांच्या या कार्याला अनेकांनी सलाम ठोकला. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
मला काही नको, माझी लेक वाचावी...
गुरुवारी विमलाबाई यांचा पोलिसांनी सत्कार केला. तेव्हा त्या अहिराणी बोलीभाषेत म्हटल्या की, मी काही मोठे काम केलेले नाही. मला काहीच नको. अंशिका ही कोणाची तरी मुलगी आहे. या जागी माझी मुलगी असती तर हेच केले असते. प्रत्येक आईचे ते कर्तव्यच आहे. आज ती माझीच मुलगी आहे असे मानते. ती वाचावी त्यासाठी धडपड केली. बरी झाल्यावर किमान तिने भेटायला यावे व माझ्या मुलांना आशीर्वाद द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.