लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येचा आलेख उतरताना दिसत आहे. मंगळवारी दिवसभरात ८०८ नवे बाधित आढळून आले आहेत. तर बरे झालेल्यांची संख्यादेखील १०७६ आहे. त्यामुळे सध्या उपचार घेत असलेले रुग्ण हे ९७६८ एवढे झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळत आहे. असे असले तरी मृत्यूचे प्रमाण मात्र कमी होत नाही. मंगळवारी दिवसभरात तब्बल १९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
मंगळवारी जिल्हाभरात ६१९७ अँटिजेन नमुने तपासण्यात आले. त्यातून ५४५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर २१६६ जणांचे स्वॅब आरटीपीसीआर चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. २६३ जणांचे अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे चाचण्यांची संख्या फार कमी झालेली नसतानाही रुग्णसंख्येत मात्र दोन दिवसांमध्ये घट झाली आहे. त्यातच बरे झालेल्यांची संख्यादेखील वाढली आहे. महिनाभरात पहिल्यांदाच उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ही दहा हजारांपेक्षा कमी झाली आहे. चारच दिवसांत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ७५२ ने कमी झाली आहे.
ॲक्टिव्ह रुग्णसंख्या
१ मे - १०,५२०
२ मे - १०,३७१
३ मे - १०,०५५
४ मे - ९७६८
चार दिवसांत गंभीर रुग्णांच्या संख्येतही घट
जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये आयसीयूत दाखल असलेल्या रुग्णसंख्येतदेखील चार दिवसांमध्ये १७८ ने घट झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला निश्चितच दिलासा मिळाला आहे. १ मे रोजी जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांच्या आयसीयूमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची संख्या ८२६ होती, तर ४ मे रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत हीच रुग्णसंख्या ६४८ झाली होती. त्यामुळे गंभीर रुग्णांची संख्यादेखील आता कमी होत आहे.
तसेच लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संख्येतही चार दिवसांत ८९ ने कमी झाली आहे. कोरोनाचा जिल्ह्यात उतरता आलेख सुरू झाला असल्याचे दिसून येत आहे.
४ मे
लक्षणे असलेले रुग्ण २६४३
आयसीयूत दाखल रुग्ण ६४८
३ मे
लक्षणे असलेले रुग्ण २६२३
आयसीयूत दाखल रुग्ण ७६३
२ मे
लक्षणे असलेले रुग्ण २७०३
आयसीयूत दाखल रुग्ण ८०८
१ मे
लक्षणे असलेले रुग्ण २७३२
आयसीयूत दाखल रुग्ण ८२६