जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयातील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी कामात दिरंगाई करीत असल्याच्या नागरिकांच्या अनेक तक्रारी आमदार सुरेश भोळे यांना प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे संबंधित प्रकरणांकडे लक्ष ठेवून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात व बैठक घेऊन प्रत्येक कामाचा आढावा घेण्यात यावा, या मागणीचे निवेदन आमदार भोळे यांनी जिल्हाधिकारी यांना मंगळवारी दिले.
कार्यालयातील कर्मचारी वारंवार गैरहजर राहत असून नागरिकांची फिरवाफिरव करीत आहेत. बाहेरगावातील नागरिकांना त्यांचे काम वेळेवर न झाल्याने सतत ये-जा करावी लागत आहे. एका कामासाठी चार ते पाच तास खोळंबून राहावे लागते, अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घ्यावा, अशा सूचना आमदार भोळे यांनी केल्या आहेत.