कुरंगी, ता. पाचोरा : जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील वाळू लिलाव करण्यासाठी स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभा घेऊन ठराव मागविण्यात आला होता. कुरंगी ग्रामस्थांनी वाळू लिलावास विरोध दर्शविला आहे.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या संदेशानुसार जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील कुरंगी व परधाडे या गिरणा काठावरच्या ग्रामपंचायतींच्या वाळू लिलावासंदर्भात विशेष ग्रामसभा घेण्यात आली. कुरंगी सरपंच मनीषा ठाकरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत गट नंबर २५, ४३१, ४३२, ६ या गिरणा नदीपात्रातील गटांचा वाळू लिलावास सर्वानुमते नकार देऊन ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
यावेळी उपसरपंच शालिग्राम पाटील, योगेश ठाकरे, ग्रामसेवक अविनाश पाटील, तलाठी दीपक दवंगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाळू लिलावाचा ठराव न देण्याची कारणे
कुरंगी गिरणानदी काठावर असलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या दोन विहिरी आहेत. मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा झाल्यास पर्यावरणाचा ऱ्हास होतो.
या नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या विहिरींची पाणीपातळी खालावली जाते.
गावातील चोरटी वाहतूक शंभर टक्के बंद आहे. सन २०१८-१९मध्ये कुरंगी गिरणापात्रातील वाळू लिलाव करण्यात आला होता. त्याचा ४२ लाख रुपये गौण खनिजचा महसूल अजूनही शासनाकडे बाकी आहे. तो ग्रामपंचायतीला न मिळाल्याने गावातील सार्वजनिक विकासकामे खोळंबली आहेत.
-पांडुरंग कडू कोळी, ग्रामस्थ, कुरंगी