नवी दिल्ली : इंग्लंडविरोधातील पहिल्या तीन कसोटींत फक्त एकच अर्धशतक करणाऱ्या विराट कोहलीवर भारताचा माजी खेळाडू इरफान पठाण याने म्हटले आहे की, त्याची आक्रमकताच त्याला त्रास देत आहे. मला वाटते की, कोहलीला प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व मिळवायचे असते. त्यामुळे तो ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूंना खेळतो.
तरीही भारताने मालिका विजय मिळवला होता -नासीर
लंडन : लीड्स कसोटीत भारताचा पराभव झाला असला तरी इंग्लंडच्या संघाने भारतीय संघाला कमी लेखू नये, याच संघाने ३६ धावांत सर्व बाद झाल्यानंतर देखील ऑस्ट्रेलियाविरोधात त्यांच्याच देशात मालिका विजय मिळवला होता, असा इशारा इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेन याने दिला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दोन सामने अजून बाकी आहेत.
चहलला आयपीएल सुरू होण्याची प्रतीक्षा
नवी दिल्ली : आरसीबीचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याने इन्स्टाग्रामवर कर्णधार विराट कोहलीसोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यात त्याने म्हटले की, ‘२० सप्टेंबर कधी येणार’ त्यावर फिरकीपटू कुलदीप याने ‘१९ नंतर येणार’ असे लिहून त्याची फिरकी घेतली. आयपीएलचे दुसरे सत्र १९ सप्टेंबरपासून यूएईत सुरू होणार आहे. त्यात आरसीबीचा पहिला सामना २० रोजी होईल.
शोएबच्या बुटात अडकला चमचा
नवी दिल्ली : पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिक हा सध्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळत आहे. त्यात गयाना ॲमेझॉन वॉरियर्स संघाकडून खेळतांना एक काटा चमचा त्याच्या बुटात अडकला होता. तो तसाच फलंदाजीला आला. हा प्रकार लक्षात आल्यावर त्याने लगेचच तो चमचा काढला. मात्र, सोशल मीडियावर हा फोटो चांगलाच व्हायरल झाला.