सचिन देव
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बसमध्ये प्रवाशांना तत्काळ तिकीट मिळावे आणि वाहकांचाही तिकिटांच्या हिशेबाचा त्रास कमी व्हावा, याकरिता महामंडळातर्फे तीन ते चार वर्षांपूर्वी वाहकांच्या हातात लोखंडी पेटी ऐवजी ईटीआयएम देण्यात आले आहेत; मात्र वारंवार हे मशीन तांत्रिक कारणांमुळे बिघडत आहेत. सद्यस्थितीला जळगाव आगारामध्ये १०० च्या वर हे मशीन बंद पडले आहे. वाहकांना पुन्हा खटखट करणारे `तिकीट ट्रे` वापरायला सुरुवात करावी लागली आहे. परिणामी, यामुळे पुन्हा वाहकांची पूर्वीप्रमाणे हिशेबाची लिखापट्टीही वाढली आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे प्रवाशांना तत्काळ तिकीट मिळण्यासाठी ‘ईटीआयएम’च्या माध्यमातून डिजिटल तिकीट प्रणाली सुरू करण्यात आली आहे. यामुळे वेळेची बचत होत आहे. मुख्य म्हणजे वाहकांना तिकिटांच्या उत्पन्नाचा करावा लागणारा हिशेबाचा त्रास कमी झाला आहे; परंतु महामंडळातर्फे देण्यात आलेल्या या ईटीआयएमला तीन ते चार वर्षे उलटल्याने या मशीनमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. बॅटरी डाऊन होणे, कि-पॅड टच न होणे, मशीन अचानक हँग होणे आदी तांत्रिक अडचणी वाढल्या आहेत. महामंडळाच्या जळगाव विभागातून विविध आगारातील एक हजाराहून अधिक मशीन बंद पडून, संबंधित कंपनीकडे दुरुस्तीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.
इन्फो :
- जिल्ह्यातील एकूण एसटी बसेस : ७४०
- सध्या सुरू असलेल्या बसेस : ७४०
- तिकिटे काढण्याच्या एकूण इलेक्ट्रॉनिक मशीन : १ हजार ८५१
- सध्या बंद असलेल्या इलेक्ट्रॉनिक मशीन -१ हजार ३४
इन्फो :
कोरोनामुळे एसटीचे ४० टक्के उत्पन्न घटले :
कोरोनामुळे एसटी महामंडळाचे गेल्या वर्षी पहिल्या लाटेत आणि यंदाच्या दुसऱ्या लाटेतही मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले; मात्र गेल्या महिन्यापासून महामंडळाची सेवा पुन्हा सुरू झाली असली, तरी सध्या ६० टक्केच उत्पन्न येत आहे. त्यामुळे सध्या जळगाव विभागातून दर महिन्याला सरासरी २० कोटींच्या घरात मिळणारे उत्पन्न आता १३ ते १४ कोटींपर्यंत येत आहे.
इन्फो :
वाहकांना करावी लागत आहे पुन्हा आकड्यांची जुळवाजुळव
ईटीआयएम या इलेक्ट्रॉनिक मशीनमुळे पूर्वी एका बटनावर रिपोर्ट मिळायचा; मात्र आता हे मशीन वारंवार बंद पडत असल्याने `तिकीट ट्रे`मधून दिवसभरात किती तिकिटे गेली, त्याचे पैसे किती आले, याचा सविस्तर हिशेब वाहकांना करावा लागत आहे. यामुळे वाहकांचा पुन्हा त्रास वाढला आहे.
इन्फो :
कर्मचाऱ्यांचे पगार होत आहेत वेेळेवर
कोरोनामुळे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे गेल्या वर्षी पगार रखडले होते. विलंबाने पगार होत असल्यामुळे गेल्या वर्षी अनेक कामगार संघटनांनी सरकार विरोधात आंदोलन पुकारले होते. त्यामुळे राज्य शासनाने महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराची जबाबदारी उचलली असून, महामंडळाला वेळोवेळी अनुदान देऊन, कर्मचाऱ्यांचे पगार करण्यात येत आहेत.
इन्फो :
‘ईटीआयएम’ बंद पडल्यानंतर वाहकांना आम्ही तिकीट ट्रे पेटी उपलब्ध करून दिली आहे, तसेच हे मशीन बंद पडत असल्याबाबत संबंधित कंपनीशी पत्रव्यवहार केला आहे.
दिलीप बंजारा, विभागीय वाहतूक अधिकारी, जळगाव.