एरंडोल : किरकोळ कारणांवरून दोघा भावांमध्ये वाद होऊन मोठ्याने लहान्याच्या डोक्यात लाकडाची झिलपी मारल्याने १८ आॅक्टोंबर २०१३ ला त्याचा मृत्यू झाला होता़ याप्रकरणी १३ मे रोजी तपासाअंती मोठ्या भावाविरूद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे़ तालुक्यातील विखरण येथे १४ आॅक्टोंबर रोजी गटलु पांडू पवार (२३) व त्याचाच मोठा भाऊ अशोक पांडू पवार यांच्यात गटलुने आपल्या सासरी पत्रे दिल्यामुळे वाद झाला होता़ ह्या वादाचे हाणामारीत रूपांतर झाले होते़ त्यामध्ये अशोक याने लहान भाऊ गटलुच्या डोक्यात लाकडाच्या झिलपीचा जोरदार वार केला होता़ त्यामुळे गटलुच्या डोक्याला जबर इजा होवून तो गंभीर जखमी झाला होता़ यानंतर लगेचच त्याच्या आईने काही ग्रामस्थांच्या मदतीने एरंडोल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले होते़ त्यानंतर जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले़ मात्र तरीही स्थिती गंभीर असल्याने औरंगाबाद येथे घाटीत त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती़ मात्र उपचारादरम्यान १८ आॅक्टोबर रोजी त्याचे निधन झाले़ त्याप्रकरणी २० रोजी एरंडोल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती़ मात्र शवविच्छेदनाच्या अहवालावरून आज पोलिसांनी अशोक पवार याच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
मोठ्याकडून लहान भावाची हत्या
By admin | Updated: May 14, 2014 00:53 IST