भुसावळ : इच्छा असेल तर मार्ग सापडतो, फक्त त्यासाठी हवा दृढनिश्चय. हाच प्रत्यय भुसावळ येथील हिमांशू व कौस्तुभ या दोघा भावांनी ३६० अंशात फिरणाऱ्या पंख्याची निर्मिती करीत दिला.
शाळेत सर्व मुलांना पंख्याची हवा लागावी या संकल्पनेतून चक्क ३६० अंशात फिरणाऱ्या पंख्याची निर्मिती त्यांनी केली. यासाठी त्यांना नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन अहमदाबाद यांची साथ मिळाली.
अशी सुचली कल्पना
इयत्ता सहावीत असताना हिमांशू विश्वासराव बडगुजर व त्याचा लहान भाऊ कौस्तुभ विश्वासराव बडगुजर यांना जाणवले की, शाळेमध्ये एकाच पंख्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना हवा लागत नाही. तर सर्वांना समसमान हवा मिळावी या संकल्पनेतून फॅन (पंखा) ३६० अंशात फिरल्यास हे शक्य होईल या विचारासह संशोधनाला सुरुवात केली. त्यांचे वडील विश्वासराव बडगुजर हे मानमोडी तालुका बोदवड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहे, यांच्याकडून त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन मिळत गेले. या संशोधनासाठी त्यांना फक्त २५० रुपये खर्च करावे लागले. विशेष म्हणजे त्यांनी निर्मित केलेल्या पंख्याला ‘ना मोटार, ना गीअर’ असे काहीच नाही. फक्त मूव्हेबल ट्रॉलीच्या चाकांचा त्यांनी उपयोग केलेला आहे.
जग मान्यतेसाठी प्रयत्न
हे संशोधन करत असताना त्यांनी अहमदाबाद येथील नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन यांच्याशी ३० ऑगस्ट २०१४ ला चर्चा केली होती, त्यांनी पाठवलेल्या संकल्पनेवर तेथेही संशोधन करण्यात आले. अखेर यास यश प्राप्त झाले व ३६० अंशात फिरणाऱ्या पंख्याची निर्मिती झाली. या दोघा भावंडांनी आतापर्यंत जवळपास ४० पेटंट नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन अहमदाबादला पाठवले आहेत. दोन्ही भावंडे दुसरी ते दहावीपर्यंत शिकत असताना त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर संशोधन करण्यास सुरुवात केलेली होती. कोरोना लॉकडाऊनच्या काळातही त्यांनी मोठ्या प्रमाणात संशोधन केलेले आहे. अर्थातच त्याला मान्यता मिळणेही तितकेच गरजेचे आहे. त्यांनी केलेल्या आविष्काराचा संशोधनाचा जग मान्यता मिळावी यासाठी बडगुजर परिवार शासनाद्वारे लढा देत आहे.
फोटो :-कौस्तुभ बडगुजर.