लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बीएचआर फसवणूक व अपहार प्रकरणात अद्याप अटक न झालेले तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे व उद्योजक सुनील झंवर यांना अटक करावी, यासाठी महाराष्ट्र राज्य ठेवीदार संघर्ष समितीने खासदार उन्मेष पाटील यांना साकडे घातले आहे.
समितीचे कार्याध्यक्ष अशोक मंडोरे व उपाध्यक्ष गिरधर डाभी यांनी उन्मेष पाटील यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपल्याला दोनवेळा भेटून ‘बीएचआर’चा माजी अवसायक आरोपी जितेंद्र कंडारेविरोधात लेखी तक्रार केली होती, तेव्हा आपण न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. सहा महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत. न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल झाले आहे, पण अजूनही दोघे संशयित आरोपी फरार असून, त्यांचा अटकपूर्व जामीन अर्जसुद्धा पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. कंडारे व झंवर स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होणार नाहीत, तरी आपण मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याकडे त्यांच्या अटकेसाठी पाठपुरावा करावा, अशी विनंती मंडोरे व डाभी यांनी केली आहे.