संशयित अल्पवयीन चोरट्याला मध्य प्रदेश पोलिसांनी घरफोडी व दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात पकडले होते. तेथील मुद्देमाल हस्तगत केल्यानंतर त्याला तेथील बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते. तेथे पोट दुखत असल्याचा बहाणा करून त्याने तेथून पलायन केले होते. याबाबत मध्य प्रदेशातील कोतवाली झाबुवा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. त्याने पलायन केल्यामुळे तेथील दोन पोलिसांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली होती. दरम्यान, एरंडोल व धरणगाव येथील चोरलेल्या दोन दुचाकी चोपड्यात आलेल्या अल्पवयीन मुलाकडे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे अशरफ शेख यांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक किरण बकाले यांनी अशरफ शेख, दीपक शिंदे, इद्रीस पठाण व भारत पाटील यांचे पथक रवाना केले होते. या पथकाने या चोरट्याला मिळालेल्या माहितीच्या ठिकाणावरूनच ताब्यात घेतले. त्याच्याजवळ एक दुचाकी होती, अधिकच्या चौकशीत आणखी एक दुचाकी चोरल्याची कबुली देत दोन्ही दुचाकी काढून दिल्या. त्याशिवाय शिरपूर व धुळे येथेही घरफोडी व दुचाकी चोरी केल्याची कबुली त्याने दिली.
बालसुधारगृहातून पलायन केलेला अल्पवयीन अट्टल चोरटा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:28 IST