ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.3 - बळीरामपेठ, सुभाष चौकात अतिक्रमण हटाव मोहिमेत हॉकर्स व अतिक्रमण निमरूलन विभागातील कर्मचा:यांमध्ये सोमवारी सकाळी झटापट झाली. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई झाली मात्र या हॉकर्सने ख्वॉजामिया झोपडपट्टीच्या पर्यायी जागेकडेही पाठ फिरविल्याचेच दिसून आले.
मनपाने बळीरामपेठ, सुभाष चौक, शिवाजीरोडवरील हॉकर्सला ख्वॉजामिया झोपडपट्टीच्या जागेवर पट्टे आखून जागा दिली आहे. मात्र हॉकर्स तेथे न जाता रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करीत आहेत. त्यावर कारवाई करून त्यांचे स्थलांतर करण्यासाठी सकाळी 10.30 वाजता मनपा अतिक्रमण विभागाचे पथक बळीराम पेठ भागात पोहोचले.
पोलीस व कर्मचा:यांचा ताफा
बळीराम पेठेत अतिक्रमण विभागातील 15 ते 20 पुरूष व महिला कर्मचारी व त्यांच्या मदतीला पोलीस कर्मचारी एकत्र आले. प्रचंड फौजफाटा पाहून बळीराम पेठेतील हॉकर्सने अगोदरच तेथून काढता पाय घेतला होता. मात्र सुभाष चौकातील भाजी विक्रेते, फळ विक्रेत्यांनी आपापल्या जागांवर ठाण मांडले होते.
अन् पळापळ झाली सुरू
बळीराम पेठेत कारवाई सारखी परिस्थिती नसल्याने अतिक्रमण कर्मचारी व पोलिसांनी आपला मोर्चा सुभाष चौकाकडे वळविला.चार ट्रॅक्टरसह हे कर्मचारी सुभाष चौकाकडे येत असल्याचे पाहून एकच पळापळ सुरू झाली. नजीकच्या काही बोळींमध्ये हे कर्मचारी लपले. तर जवळपास असलेल्या केळी तसेच, चपला विक्रेता, भाजीपाल्याच्या पाच लोटगाडय़ा पथकाने ताब्यात घेतल्या. ही जप्ती करत असताना कर्मचारी व हॉकर्समध्ये सुभाष चौकात झटापट झाली. प्रचंड आरडाओरड या ¨ठकाणी सुरू होता. अखेर पोलिसांनी मध्यस्ती करून वाद मिटविला.