लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मंगळवारी दिवसभरात ३० वर्षांच्या पुरूषासह जिल्हाभरात तब्बल १९ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होत असली तरी दररोज होणाऱ्या मृत्यूंची संख्या मात्र कमी होतांना दिसत नाही, ही चिंताजनक बाब अजूनही कायम आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे. मंगळवारी दिवसभरात नवे बाधित ८०८ आढळले तर बरे झालेल्यांची संख्या ही १०७६ आहे. त्यामुळे ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २८७ ने कमी झाली आहे.
सध्या जिल्ह्यात ९७६८ रुग्ण उपचार घेत आहेत. मृतांमध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील ३१ वर्षांचा, जळगाव तालुक्यातील ३० वर्षांच्या तरुणांचाही समावेश आहे.
जीएमसीत वर्षभरात ८५० कोरोना मृत्यू
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (जीएमसी) मध्ये आतापर्यंत वर्षभरापेक्षा जास्त कालावधीत कोरोनाने मृत्यू पावलेल्यांची संख्या ही ८५० झाली आहे. मंगळवारी जिल्हाभरात झालेल्या १९ मृत्यूंपैकी तब्बल १२ जणांचा मृत्यू हा वैद्यकीय महाविद्यालयात झाला आहे.