जिजाबराव वाघ
चाळीसगाव : मंगळवारी ढगफुटीसदृश पावसामुळे कन्नड घाटात दरडी कोसळल्याने बुधवारी
दिवसभरही दगड, झाडे आणि गाळ हटविण्याचे काम सुरू होते. अडकलेली तीन मालवाहू तर एक प्रवासी वाहन बाहेर काढण्यात आले. दरम्यान मालवाहू व अवजड वाहनांची वाहतूक सुरळीत होण्यासाठी अजूनही चार ते पाच दिवसांचा अवधी लागणार असून दुचाकी वाहनांची वाहतूक मात्र
गुरुवारपासून सुरू करण्यात येणार आहे.
एनडीआरएफच्या ३० जणांचे पथक व महामार्ग पोलिस कर्मचारी युद्ध पातळीवर घाटातील वाहून आलेला गाळ, दरडीचे दगड हटविण्याचे काम करीत आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत अडकलेली चार वाहने काढण्यात आली आहे. आता फक्त एक नादुरुस्त असलेली मालवाहू गाडी गाळात अडकलेली आहे. तिला गुरुवारी बाजूला करुन दुचाकी गाड्यांची वाहतुक सुरु करण्यात येणार आहे.
चौकट
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून झाली पाहणी बुधवारी घाटातील स्थितीची औरंगाबाद येथील भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक अरविंद काळे व तांत्रिक प्रबंधक महेश पाटील यांनी पाहणी करून आढावाही घेतला. घाटात म्हसोबा मंदिराजवळ दरड कोसळल्याने एक भला मोठा दगड रस्त्यात पडून आहे. त्याला हटविण्यात येणार असून आज गुरुवारपासून रस्ता खचलेल्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. दुचाकी वाहने गुरुवारपासून सोडण्यात येणार आहे. अशी माहिती महेश पाटील यांनी 'लोकमत'शी
बोलतांना दिली. ....
इन्फो
बुधवारी दिवसभर एनडीआरएफ टीमच्या मदतीने अडकलेली चार वाहने बाहेर काढली. सद्य:स्थितीत फक्त एक नादुरुस्त मालवाहू गाडी अडकलेली आहे. तिला बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली जाणार आहे. - भागवत पाटील पोलीस उपनिरीक्षक, महामार्ग पोलीस केंद्र, चाळीसगाव.