पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील महेंद्र सोनवणे (२१) या तरुणाने अल्पवयीन युवतीशी सतत संपर्क साधत, प्रेमाचा बहाणा करत, तिला विश्वासात घेतले. अश्लील फोटो मोबाइलमध्ये काढून त्याआधारे तिला धमकावत गेल्या महिनाभरापासून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याची वाच्यता केली तर तुझ्या वडिलांना जिवे ठार मारीन, अशी धमकी या युवकाने दिल्याने ही पीडित युवती प्रचंड घाबरली.
या युवकाचा अन्याय व वासना दिवसेंदिवस वाढत गेल्याने पीडित युवतीने हा प्रकार आपल्या घरच्यांना सांगितला. घरच्यांनी पाचोरा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. त्याआधारे पाचोरा पोलिसांनी आरोपी महेंद्र सोनवणे या युवकाविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. पीडित युवतीसह युवकाची पाचोरा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय वसावे करीत आहेत.