जळगाव : पोलीस दल हे शिस्तीचे खाते मानले जाते. त्यामुळे राज्यात सर्वच विभागात अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संघटना असताना पोलीस दल त्याला अपवाद आहे. ‘सदरक्षणाय, खलनिग्रहणाय...’ असे ब्रीद पोलिसांच्या खाकी वर्दीवर लावलेले आहे. याचा अर्थ सामान्य जनतेला सुरक्षित ठेवून ‘खल’वृत्तीने वागणाऱ्यांना ठेचण्याचे काम पोलिसांनी करणे अपेक्षित आहे; परंतु गेल्या काही वर्षांत पोलिसांना या ब्रीद वाक्याचा विसर पडलेला दिसतो. आपल्याच खात्यातील लोकांना ठेचण्याचे कार्य सुरू झाल्याचे काही घटनांवरून दिसून येत आहे.
स्थानिक गुन्हे शाखेत हे राजकारण मोठ्या प्रमाणात आहे. या शाखेत सेनापती बदलतो, मात्र प्यादे तेच राहतात. त्यामुळे अंतर्गत राजकारणाला अधिक खतपाणी घातले जाते. सध्या नरेंद्र पाटील (वारुळे) यांच्यावर अश्लील संदेश पाठविल्याचा आरोप आहे, त्यात त्यांना अटक झालेली आहे. प्रथमदर्शी पुराव्यावरून वारुळे यांना अटक झाली असे तपासाधिकारी सांगतात, तपासात पुढे काय निष्पन्न होते हे येणारा काळ सांगेलच. दोषी असतील तर त्याचे समर्थन कोणीच करणार नाही. याआधी देखील अनेक कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. गुन्ह्याचे स्वरूप पाहता त्यातील काहींना निलंबित करण्यात आले आहे तर काहींना बडतर्फ. आधीच्या घटनांवर नजर टाकली तर वर्चस्वावरून अंतर्गत गटबाजी हेच कारण पुढे आलेले आहे. त्यातही या गटबाजीला अर्थकारण हेच कारण आहे. त्याशिवाय एकाच जागेवर वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची मक्तेदारी कायम राहिली आहे. यावेळी काही प्रमाणात ती मोडण्याचा प्रयत्न पोलीस अधीक्षकांनी केला असला तरी अजूनही ती पूर्णपणे मोडीत निघालेली नाही.
निनावी अर्जाचा शस्त्र म्हणून वापर
एकमेकांचा काटा काढण्यासाठी निनावी अर्ज हे एक मोठे शस्त्र कर्मचाऱ्यांकडून वापरले जाते. खास करून स्थानिक गुन्हे शाखेच्याबाबतीतच हा प्रकार घडतो. बदली प्रक्रियेच्या काळात तर त्याला पेवच फुटते. पोलीस अधीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक व महासंचालक स्तरावर असे अर्ज यापूर्वी झालेले आहेत. आतादेखील निनावी अर्जाची चर्चा आहे. बऱ्याच अधिकाऱ्यांनी खातरजमा न करता त्यावर निर्णय घेतल्याची उदहारणे आहेत. अर्जात तथ्य असेल तर कारवाई झालीच पाहिजे, मात्र नाहक कोणाचा काटा काढण्याचा एखाद्याचा हेतू असेल तर तेदेखील चुकीचे आहे. गेल्या काही वर्षाच्या काळात अनेकांवर अन्याय झालेला आहे.
एसीबीचा वापर करून संपविले
गेल्या दोन वर्षात एसीबीचा वापर करून पोलिसांनीच पोलिसांना संपविल्याच्या घटना घडलेल्या आहेत. भलेही तक्रारदार दुसरा असेल मात्र त्यामागचा बोलावता धनी हा पोलीसच निघालेला आहे. अवैध धंदेचालक व पोलीस यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. जो मुळात अवैध धंदे करतो, तोच एसीबीकडे तक्रार कशी करू शकतो, हे सर्वसामान्यांना कळतं तर पोलिसांना कळत नसावे का?