लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शहरातील मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही मनपा प्रशासनाकडून गाळेधारकांवर थकीत भाड्याची रक्कम भरण्यासाठी दबाव टाकला जात आहे. मनपा प्रशासनाच्या या दबावाविरोधात शुक्रवारपासून शहरातील सोळा अव्यावसायिक मार्केटमधील गाळेधारकांनी बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.
गुरुवारी छत्रपती शाहू महाराज कॉम्प्लेक्समध्ये महानगरपालिका मार्केट गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी नगराध्यक्ष पांडुरंग काळे यांच्या उपस्थितीत १६ मार्केटच्या अध्यक्षांची व पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला राजस कोतवाल, संजय पाटील, युवराज वाघ, तेजस देपुरा, पंकज मोमाया, वसिम काझी, सुरेश पाटील, विलास सांगोरे, रिजवान जागीरदार, प्रकाश गागडाणी, रमेश तलरेजा, सुजित किनगे, शैलेंद्र वानखेडकर, हेमंत परदेशी, शिरीष थोरात, अमोल वाणी, अमित गौड उपस्थित होते. या बैठकीत एकमुखाने बेमुदत संपाचा निर्णय घेण्यात आला.
मनपा प्रशासन केवळ गाळेधारकांच्या मागेच का लागले आहे?
शहरातील अनेक बड्या नागरिकांनी अजूनही मनपाच्या मालमत्ता कराची रक्कम भरलेली नाही, मनपाच्या मालकीच्या कोट्यवधींच्या जागा धूळखात पडलेल्या आहे. बेसमेंटचा विषय असो वा इतर मालमत्तांचा विषय असो, याकडे महापालिका प्रशासन कधीही लक्ष द्यायला तयार नाही. मात्र, ज्या गाळेधारकांना दिवसाला पुरेल इतकेच उत्पन्न मिळते, त्या गाळेधारकांच्या मागे मनपा प्रशासन हात धुवून का लागले आहे, असा प्रश्न गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. महात्मा गांधी मार्केट येथील उत्तम कलेक्शन हा गाळा मनपा अधिकाऱ्यांनी मार्केटमध्ये जाऊन सील केला तसेच मनपा अधिकारी इतर गाळेधारकांवर पैसे भरण्यासाठी दबाव आणत आहेत.
योग्य निर्णय होणार नाही तोपर्यंत कायम राहणार संप
आतापर्यंत गाळेधारकांची दिशाभूल केली जात आहे. सध्या पालकमंत्री हे कोरोनाबाधित असल्याने ही बैठक लांबली आहे. मात्र, तरीही मनपा प्रशासनाने गाळेधारकांना दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. गाळेधारक मनपाने निश्चित केलेली रक्कम भरू शकत नाहीत, जोपर्यंत या विषयावर योग्य निर्णय होणार नाही, तोपर्यंत गाळेधारकांचा संप कायम राहील, असेही गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
ही मार्केट राहणार बंद
रामलाल चौबे मार्केट, महात्मा गांधी मार्केट, जुने बी. जे. मार्केट, डॉ. आंबेडकर मार्केट, धर्मशाळा मार्केट, छत्रपती शाहू मार्केट, भास्कर मार्केट, भोईटे मार्केट, जुने शाहू मार्केट, रेल्वे स्थानकाजवळील दुकाने, शामाप्रसाद मुखर्जी उद्यानलगतचे मार्केट, नानीबाई अग्रवाल मार्केट, वालेचा मार्केट, गेंदालाल मिल कॉम्प्लेक्स, शिवाजी नगर दवाखान्याजवळील दुकाने, निर्मलाबाई लाठी शाळा इमारत.