रेल्वे प्रशासनाने कमी उत्पन्न असलेले दोन थांबे आणि कोल्हापूरहुन निघण्याची वेळही लवकर केल्यामुळे महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या धावण्याच्या वेळेत तब्बल एक तासांचा फरक पडला आहे. ही गाडी पूर्वीच्या वेळापत्रकानुसार थांबा असलेल्या स्टेशनावर एक तास लवकर जात आहे. यामध्ये जळगाव स्टेशनवर ही गाडी सकाळी सव्वा आठ ऐवजी सात वाजताच येत आहे. तर चाळीसगाव स्टेशनावर सकाळी सव्वा सात ऐवजी सकाळी सहा वाजता येत आहे. यामुळे चाळीसगाव, पाचोरा व जळगाव येथील प्रवाशांना स्टेशनावर एक तास लवकर यावे लागत आहे. यामुळे चाळीसगाव, पाचोरा व जळगाव येथून नेहमी अफडाऊन करणाऱ्या दोन हजार चाकरमानी व प्रवाशांना या गाडीच्या वेळा बदल्यामुळे फटका बसत आहे.
इन्फो :
खासदारांचा रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा
या गाडीची वेळ बदल्यामुळे जळगाव, पाचोरा व चाळीसगाव येथील विविध प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार उन्मेश पाटील यांच्याकडे या गाडीची वेळ पूर्वी प्रमाणेच राहू देण्याची मागणी केली. प्रवाशांची ही मागणी लक्षात घेता उन्मेश पाटील यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनिल मित्तल यांना पत्र लिहून,ही गाडीची वेळ पूर्वी प्रमाणेच असू देण्याची मागणी केली आहे. अन्यथा प्रवाशांबरोबर आपणही आंदोलन करणार असल्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे.