या बसचे चालक पुरुषोत्तम साळुंखे यांच्या सतर्कतेमुळे बसमधील प्रवाशांसह हाॅटेलांमधील चहा, नास्ता करणारे नागरिक, लहान बालके, महिलांचे प्राण वाचले आणि मोठा अनर्थ टळला. यावेळी प्रवाशांसह नागरिकांची एकच आरडाओरड व धावपळ उडाल्याचे चित्र दिसून आले. घटनास्थळी नागरिकांची एकच गर्दी उसळली होती. ही घटना दि. १४ रोजी सकाळी ७.१० वाजेच्या सुमारास भडगाव बसस्थानकाबाहेर घडली.
एरंडोल पुणे ही एस. टी. बस भडगाव बसस्थानकाजवळील पारोळा चौफुली भागातून जात असताना रस्त्यावरच मध्ये एक लक्झरी थांबलेली होती. बसचालक पुरुषोत्तम साळुंखे यांनी या लक्झरीच्या बाजूने बस वळवून पुढे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अचानक या बसचे स्टेअरिंग जाम झाल्याने चालक पुरुषोत्तम साळुंखे यांनी तात्काळ बसचा ब्रेक मारत रस्त्याच्या कडेला गटारी काँक्रिटीकरणाच्या कामाला थांबा मिळाला. यावेळी बसमधील प्रवाशांमध्ये व हाॅटेलांमध्ये चहा, नाश्ता करणारे नागरिक, लहान बालके, महिलांनी एकच आरडाओरड केली. चालक पुरुषोत्तम साळुंखे यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
प्रवाशांना रस्त्यावरच उतरविण्यात आले. घटनास्थळी बसस्थानकातील दुसऱ्या बसचे चालक अर्जुन पाटील भडगाव यांनीही मदतीसाठी धाव घेतली. मात्र बसची स्टेअरिंग जाम झाल्याने बस काढता न आल्याने पुन्हा रस्त्याच्या कडेला लावण्यात आली. घटनास्थळी वाहनधारक, नागरिकांसह महिलांची गर्दी जमल्याचे दिसून आले. अनेकदा भर रस्त्यावर मध्येच लक्झरी थांबविल्या जातात. त्यामुळे वाहनधारकांना वाहने चालविणे अडचणीचे ठरताना दिसते. पायी जाणाऱ्या नागरिक, महिला, शाळेच्या विद्यार्थ्यांनाही या रस्त्यांवर थांबलेल्या लक्झरींमुळे जीव मुठीत घेऊन चालावे लागते. जीवघेणे प्रसंगही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याबाबत एरंडोल पुणे बसचे चालक पुरुषोत्तम साळुंखे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, बसस्थानकाबाहेरील रस्त्यामध्ये थांबलेल्या लक्झरीच्या बाजूने बस काढताना अचानक बसचे स्टेअरिंग जाम झाल्याने बस तात्काळ रस्त्याच्या कडेला थांबविली, अशी माहिती पुरुषोत्तम साळुंखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
160821\16jal_5_16082021_12.jpg
भडगाव बसस्थानकाबाहेर याच लक्झरीच्या बाजूने बस वळवितांना स्टेअरींग जाम झाल्याने रस्त्याच्याकडेला थांबलेली बस.