जळगाव : पीडितांना न्याय देण्यासाठी अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी गुरुवारी दिले.
जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा सरकारी अभियोक्ता केतन ढाके, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहारे, अनिल खंडेराव, डी. व्ही. चौधरी आदी उपस्थित होते.
१३ गुन्हे पोलीस तपासावर बैठकीच्या सुरुवातीला समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी जूनअखेर अनुसूचित जातीचे ११, तर अनुसूचित जमातीचे ५ असे एकूण १६ गुन्हे पोलीस तपासावर असल्याची माहिती बैठकीत दिली. त्यापैकी ९ गुन्ह्यांची निर्गती पोलीस विभागाने केली आहे. उर्वरित ७ व जुलैमध्ये नव्याने दाखल झालेले ६ असे एकूण १३ गुन्हे पोलीस तपासावर असल्याचे सांगितले. त्याचबरोबर जुलैमध्ये २१५ पीडितांना अर्थसाहाय्य मंजूर करण्यात आल्याची माहिती पाटील यांनी बैठकीत दिली.