एरंडोल : जिल्ह्यातील सर्व वाळू गटांची मुदत संपल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी १० जून ते ३० सप्टेंबर दरम्यान अवैध वाळू रोखण्यासाठी संयुक्त पथके तयार करून कारवाईचे आदेश दिले आहेत. मात्र कढोली, वैजनाथ, टाकरखेडा, नागझिरी गिरणा नदी हद्दीत भरदिवसा व रात्री ट्रॅक्टर्स, डंपर, टिप्परद्वारे मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक होत असल्याचे चित्र आहे.
त्याचबरोबर कढोली परिसरात मुरूम काढण्यासाठी मोठमोठ्या टेकड्या कोरून अवैध गौणखनिज बेकायदा वाहतूक करून पर्यावरणाला धोका निर्माण केला जात आहे.
गाव परिसरातील टेकड्या कोरून वाळू वाहतूक होत असल्याने परिसर भकास झाला आहे. संबंधित विभागाकडून अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी नेमून दिलेल्या पथकाला व वरिष्ठांना अवैध वाहतूक करणारी कोणाकोणाची वाहने असतात याविषयी सर्व काही माहीत असते, मात्र महसूल राजा लोभ, मोह, माया यामुळे गंभीर नसल्याचे चित्र आहे.
गिरणा नदीचे व नाले, टेकड्यांचे अस्तित्व टिकवून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महसूल यंत्रणेकडूनच अपेक्षा व्यक्त होत आहेत.
अवैध वाळू वाहतुकीला आळा बसावा म्हणून स्थानिक पातळीवर पथक तयार करण्यात आले आहे. तरीही अवैध वाळू वाहतूक होत असेल तर संबंधित अधिकाऱ्यांना सक्त सूचना देणार आहोत.
- विनय गोसावी, प्रांताधिकारी, एरंडोल
अवैध वाळू वाहतूक तसेच गौणखनिज वाहतूक रोखण्यासंदर्भात गावात नेमून दिलेल्या समितीने व ग्रामस्थांनीही सहकार्य केले तर आळा बसू शकतो.
- अजय जाधव, मंडळ अधिकारी तथा पथक प्रमुख