जळगाव : पावसाळ्यात गावाला, फिरायला किंवा अन्य कोणत्याही कारणाने स्वत:च्या वाहनाने प्रवासाला निघताय, तर मग स्वत:चा आणि इतरांचा जीव वाचविण्यासाठी आरटीओने जी नियमावली घालून दिली आहे, त्याकडे जरा बघा. पावसाळ्यात अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते, त्यातून जखमी व जीव जाणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. वाहन घराच्या बाहेर काढण्यापूर्वी १० हजार किलोमीटर फिरले असेल तर सर्व्हिसिंग आवश्यक असून अन्यथा रस्त्यात धोका निर्माण होऊ शकतो. जळगाव जिल्ह्यात दोन वर्षात जून ते सप्टेबर या चार महिन्यात पावसाळ्यात ४७७ अपघात झाले असून त्यात ३०० जणांचा मृत्यू तर ४४६ जण जखमी झालेले आहेत. मागील जून महिन्यात ७८ अपघात झाले त्यात ६२ जणांचा मृत्यू झाला आहे.
पावसाळ्यात प्रवास करताना अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे जेथे जायचे तेथे निर्धारित वेळेत पोहचणे शक्य होत नाही. पावसात रस्त्यावर सांडलेले वाहनाचे तेल, डिझेल, ग्रीस व स्निग्ध पदार्थामुळे रस्ता निसरडा होत असतो. त्यामुळे वाहनांच्या चाकाची रस्त्याबाबत आवश्यक असणारी पकड कमी होते, परिणामी वाहन घसरण्याची शक्यता असते. कोरड्या रस्त्यापेक्षा ओल्या रस्त्यावर वाहनाचा ब्रेक उशिरा लागतो. त्यामुळे वाहन रस्ता सोडण्याची शक्यता असते अशा वेळी अपघात होतो. त्यामुळे वेग कमी ठेवणे गरजेचे आहे. खराब हवामानाच्यावेळी दोन वाहनांमधील अंतर पुरेसे असणं आवश्यक आहे. जी व्यक्ती वाहन चालविते त्याला जी अडचण येते तीच अडचण आपल्या मागे किंवा पुढे चालणाऱ्या वाहनचालकाला असते, त्यामुळे दोन वाहनांमधील अंतर हे सहा सेंकदाचे ठेवावे.
स्टेअरींगची पकड घट्ट ठेवा
१) पावसाळ्यात वारे जोरात वाहतात तर कधी पाऊसही मुसळधार असतो, अशा वेळी समोर रस्ता दिसत नाही, त्यामुळे चालकाने स्टेअरिंगची पकड घट्ट ठेवावी जेणे करुन वाहन रस्ता सोडणार नाही.
२) वाहन रस्त्याच्या बाजुला नाही तर जास्त अंतरावर पार्किंग करावे.
३) लाईट व इंडिकेटर बंद ठेवावे, ते सुरु ठेवल्यास आपले वाहन पुढे धावते आहे असे मागून येणाऱ्या वाहन चालकाला वाटते आणि त्यामुळे मागील वाहन धडकण्याची शक्यता अधिक असते. वाहन चालू असताना लाईट मात्र आवश्यक सुरु ठेवावेत.
कोट...(फोटो)
पावसाळ्याच्या दिवसात वाहन सुस्थितीत ठेवणे आवश्यक आहे. टायर, लाईट, साईड इंडीकेटर, ब्रेक व इंजिन ऑईलची तपासणी करुनच घराच्या बाहेर निघावेत. या दिवसात अपघाताचे प्रमाण जास्त असते. रात्रीच्यावेळी वाहन चालविताना अधिक सतर्क राहून बदलत्या वातावरणाकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. शक्यतो पावसाळ्यात आवश्यक असेल तरच प्रवास करावा. अपघात टाळण्यासाठी आरटीओच्यावतीने दरवर्षी जनजागृती केली जाते.
-श्याम लोही, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
पावसाळ्यातील अपघात (जून ते सप्टेबर)
वर्ष अपघात मृत्यू जखमी
२०१९ -२४० - १२७ - २८५
२०२० - २३७ - १७३ - १६१
२०२१ (जूनपर्यंत)- ७८ - ६२ - १११