डेमला कॉलनीतील चिन्मय अपार्टमेंट रहिवाशांचे मत : स्वतंत्र कनेक्शन न परवडणारे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अमृत अंतर्गत लवकरच पूर्ण होणाऱ्या पाणी पुरवठा योजनेमुळे नागरिकांना २४ तास पाणी पुरवठा होणार आहे. मात्र, ही मनपाने अपार्टमेंटला एकच नळ कनेक्शन देण्याचा घेतलेला निर्णय हा योग्य नसून, मनपा प्रशासनाने या निर्णयावर विचार करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे ३० ते ४० वर्षे जुन्या असलेल्या अपार्टमेंटबाबत तरी मनपाने एकच नळ कनेक्शन न देता प्रत्येक फ्लॅटधारकाला स्वतंत्र कनेक्शन देण्यात यायला हवे, अशी मागणी शहरातील डेमला कॉलनीती चिन्मय अपार्टमेंटमधील रहिवाशांनी केली आहे.
डेमला कॉलनीतील चिन्मय अपार्टमेंटमध्ये एकूण ८ फ्लॅटधारक असून, हे अपार्टमेंटचे बांधकाम १९९० च्या काळातील आहे. त्यामुळे नवीन सम तयार करणेदेखील परवडणारे नाही. पूर्वीप्रमाणेच मनपाने प्रत्येक फ्लॅटधारकाला स्वतंत्र कनेक्शन द्यायला पाहिजे. अपार्टमेंटला एकच कनेक्शन दिले तर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच मनपाने वॉटरमीटरची व्यवस्था केली तरी अनेकांचा वापर जास्त राहील व बिलाची रक्कम सर्व फ्लॅटधारक एकत्रित जमा करतील, यामुळे ज्याने पाणी कमी वापरले तरी त्यांना सर्वांप्रमाणेच सारखी रक्कम द्यावी लागणार आहे. मनपाने जुन्या अपार्टमेंटबाबत तरी वेगळा निर्णय घ्यावा.
कोट..
मनपाने हा निर्णय नवीन अपार्टमेंटबाबत घेतला तर योग्य ठरू शकतो. मात्र, जुन्या अपार्टमेंटमध्ये सम किंवा पाण्याची टाकी तयार करण्यासाठी जागाच नाही. अशा परिस्थितीत अपार्टमेंटमधील फ्लॅटधारकांना ते काम आधी करावे लागणार आहे. यामुळे अनेक अडचणीदेखील येतील.
- गायत्री पाटील, रहिवासी
आधी मनपाने अपार्टमेंटमध्ये स्वतंत्र कनेक्शन दिलेच आहेत. आताही नागरिकांना पाणी मिळत आहे. अमृतचे काम पूर्ण झाल्यानंतरदेखील पाणी मिळणार आहे. त्यामुळे आधीप्रमाणेच अपार्टमेंटमधील रहिवाशांना स्वतंत्र कनेक्शन दिले पाहिजे. अपार्टमेंटला एकच कनेक्शन दिल्यास अडचणीच निर्माण होती.
- गायत्री कुलकर्णी, रहिवासी
आमच्या अपार्टमेंटमध्ये पाण्याची टाकी आहे. मात्र ती लहान आहे. मोठी टाकी तयार करण्यासाठी अपार्टमेंटमध्ये जागाच नाही. ८ फ्लॅट असतानाही मनपाने आताही चार कनेक्शन दिले आहेत. तरीही अपार्टमेंटमधील रहिवाशांची पाण्यासाठी अडचण निर्माण होत नाही. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच आहेत तेवढेच कनेक्शन द्यायला हवेत.
- डॉ. सीमा काळुंखे, रहिवासी
अपार्टमेंटला एकच कनेक्शन दिल्यास एखादा फ्लॅटधारक जास्त पाण्याचा वापर करेल तर दुसरा कमी करेल; मात्र सर्वांना एकसारखेच बिल भरावे लागणार आहे. त्यामुळे मनपाने स्वतंत्र कनेक्शन दिले तर ज्याचा वापर जास्त असेल त्यालाच ते बिल द्यावे लागेल. मनपाचा निर्णयामुळे आणखीच समस्या वाढतील.
- कल्याणी सूर्यवंशी, रहिवासी