जळगाव जिल्हा शिक्षक व शिक्षकेतर नोकरांच्या सहकारी पतपेढीतर्फे तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम जी. एस. हायस्कूल येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, देश सक्षम करायचा असेल, तर जागतिक दर्जाची शिक्षण व्यवस्था निर्माण केली पाहिजे. सामान्य माणसाला हक्काची आर्थिक सहाय्य करणारी संस्था म्हणजे माध्यमिक पतपेढी होय. शासन शिक्षणातून अंग काढून घेत आहे, त्यासाठी आवाज उठवला पाहिजे.
आमदार अनिल पाटील यांनी बक्षीस वितरण म्हणजे मुलांना एक प्रकारची प्रेरणा असून प्रगतीच्या दिशेला मुलांना नेण्याचा प्रयत्न असतो. पतपेढ्या डबघाईला जात असताना जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकांची पतपेढी आशिया खंडात सर्वात कमी दराने व्याज आकारणारी पतपेढी आहे, याचे कौतुक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष शालिग्राम भिरुड यांनी केले. येणाऱ्या काळात सभासद शिक्षक व शिक्षकेतर पाल्यांसाठी वसतिगृहाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
कार्यक्रमात गुणवंत पाल्यांना चांदीची पदके व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील, डॉ. अनिल शिंदे, खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र जैन, गं. स. हायस्कूलचे चेअरमन योगेश मुंदडे, पतपेढी संचालक पी. डी. पाटील, नंदू पाटील, गजानन गव्हारे, राजू चौधरी, जयवंतराव पाटील, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकूळ बोरसे, शहराध्यक्ष मनोज पाटील यांच्यासह स्थानिक संचालक, विविध शिक्षक व शिक्षकेतर संघटनांचे पदाधिकारी, तालुक्यातील सभासद बांधव व गुणवंत पाल्य उपस्थित होते.
सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे केले यांनी तर आभार संचालक आर. डी. चौधरी यांनी मानले.