कजगाव, ता. भडगाव : कजगावच्या चालीरीती काही वेगळ्याच आहेत. जुन्या चालीरीती आजही नवतरुण कटाक्षाने पाळतात. यात बोली बोलून फुटणारा पोळा हाही एक महत्त्वाचा सण. दि. ६ रोजी कजगावात बोली बोलून पोळा फुटणार आहे.
येथे पोळा सण आगळ्यावेगळ्या चालीरीतीने साजरा करण्यात येत असतो. यात जुन्या गावातील बाजारपट्टा व बसस्थानक भागातील सावता माळी चौक या दोन्ही ठिकाणी बोली बोलून पोळा फोडण्यात येतो. प्रसंगी बोली बोलून पोळा फोडण्याचा मान मिळविणाऱ्याचा सत्कार करण्यात येतो.
गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा येथे अत्यंत उत्साहात पार पाडली जाते. बसस्थानक भागातील रहिवासी तसेच सावता माळी चौकातील रहिवासी बाळासाहेब नाईक, विक्रम पवार, ज्येष्ठ नागरिक डॉ. उत्तमराव पाटील, विक्रम कौतिक महाजन, माजी सरपंच निवृत्ती पवार, शांताराम नामदेव महाजन, संतोष धुडकू महाजन यांनी अंदाजे चाळीस वर्षांपूर्वी बोली बोलून पोळा फोडण्याची संकल्पना मांडली नि या विचाराला साऱ्यांनीच होकार दिला.
सावता माळी चौकातील पोळा बोली बोलून फोडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर कजगाव जुन्या गावातदेखील बोली बोलून पोळा फोडण्याबाबत साऱ्यांचे एकमत झाल्याने तेथेदेखील गेल्या पाच-सात वर्षांपासून पोळा बोली बोलून फोडण्यास सुरुवात झाली आहे. ती परंपरा आजही पाळली जात आहे. बसस्थानक परिसरातील शेतकरी आपल्या सर्जा-राजाला सजवून सावता माळी चौकात आणतात तर जुन्या गावातील शेतकरी बाजारपट्ट्यात आपल्या सर्जा-राजाला आणतात.
याठिकाणी सर्व शेतकऱ्यांचे बैल एकत्रित जमल्यानंतर बोली लावली जाते. बोलीमध्ये जो शेतकरी जास्त बोली बोलेल, त्याला पोळा फोडण्याचा मान दिला जातो. याप्रमाणे पोळा फोडणाऱ्या सर्जा-राजाला सर्वांत पुढे वाजत गाजत मानाने पुढे जाऊ देण्यात येते. यानंतर इतर बैलांना सोडण्यात येते. याप्रमाणे पोळा साजरा करण्यात येतो.
बोलीतून आलेल्या पैशातून जुने गावातील विविध मंदिराची देखभाल दुरुस्ती सुधारणा करण्यात येते तर सावता माळी चौकातील बोलीमधून हनुमान मंदिराची देखभाल सजावट केली जाते.
या आगळ्या वेगळ्या पोळ्याची चर्चा परिसरात असल्याने बोली बोलून फुटणारा पोळा पाहण्यासाठी कजगावसह परिसरातील असंख्य शौकीन या ठिकाणी जमा होतात. प्रसंगी फार मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
050921\05jal_12_05092021_12.jpg
सारे सर्जा राजा एकत्र आल्यानंतर बोली घेणाऱ्यास पोळा फोडण्याचा मान दिला जातो, त्याचा सत्कार केला जातो.