भुसावळ : येथे सोमवारी दुपारी सुमारे दीड तास जोरादार पाऊस झाल्याने अनेक भागात रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले.
येथील रेल्वेच्या झेडआरटीआयला (प्रशिक्षण संस्था) जाणारा एकमेव रोड प्रचंड पावसाच्या पाण्याखाली गेल्याने तेथून ये -जा करणाऱ्या वाहनधारकांची तारांबळ उडाली. झेडआरटीआय भागातून जाणाऱ्या एकमेव रस्त्यावर अशी समस्या नेहमीच निर्माण होते. रेल्वेच्या चुकीच्या कामामुळे नेहमीच हा रस्ता पाण्याखाली जात असतो. हा रोड बनवत असतांना दोन भुयार तयार करण्यात येणार होते. परंतु रस्त्याचे काम अर्धे झाल्यावर दुसरा भुयारी बोगदा हा मिल्ट्री स्टेशनने करु न दिल्याने या रस्त्याचे काम अपूर्ण राहिले. शेड न टाकल्याने पावसाचे संपूर्ण पाणी रस्त्यावर येत असल्याने वाहनात पाणी जाऊन अनेक वाहने बंद पडल्याने नागरिकांचे हाल झाले.
या भुयारी मार्गाची लांबी साधारण दोनशे मीटरच्या आसपास आहे. याची
खोलाई कुठे वीस तर कुठे पंचवीस फूट आहे. पावसाचे पाणी बाहेर पडण्यासाठी रेल्वेने भुसारी मार्गावर एकच लहान मोटार बसवली आहे. तेथे दोन मोठ्या मोटारी बसवायला पाहिजे होत्या.
रेल्वेने दोन रेल्वे गेट बंद केले व हा भुयारी मार्ग तयार केला आहे. हा मार्ग
तयार करण्यासाठी रेल्वेला करोडोंचा खर्च आला आहे. रेल्वे कडून
भुयारी मार्गाचे नियोजन चुकले असेही त्या भागातील रहिवाशांनी म्हटले आहे.
गोंदिया केबिन जवळ पण असाच चांगला भुयारी मार्ग करावा अशी मागणी साकरी फाटा भागातील रणजित चौधरी यांनी केली आहे.
दरम्यान रस्त्यावरुन जाणारे रेल्वेच्या उत्तर भागातील रेल्वे कर्मचारी तसेच कंडारी, लीम्पसक्लब, एमओएच शेड, पीओएच शेड, ऑर्डनन्स फॅक्टरी, दिपनगर, वरणगाव, मुक्ताईनगर, साकरी, फेकरी या भागातील हजारो वाहनधारकांचे हाल झाले.
या रस्त्याच्या कामाबाबत मिल्ट्री स्टेशनची अडचण आहे. आमचे या विषयावर त्यांच्या अधिकाऱ्यांशी बोलणे सुरु आहे. त्यांच्याकडून होकार मिळाला की, पुढील काम पूर्ण झाल्यावर या रस्त्याची ही समस्या दूर होईल.
-तरुण दंडोतीया, वरिष्ठ मंडळ अभियंता (समन्वय) भुसावळ.
झेडआरटीआयला जाणाऱ्या रोडवर साचलेले पाणी. (छाया : श्याम गोविंदा)