२ तासातच ६६ मिमी पावसाची नोंद : गल्लोगल्लीत साचले पाणी; दुरुस्ती केलेले रस्तेही उखडले
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात बुधवारी रात्री अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली असून, बुधवारी रात्री ७ पासून सुरू झालेल्या पावसाने सुमारे २ ते अडीच तास पावसाने अक्षरश: थैमान घातले. अवघ्या २ तासात शहरात एकूण ६६ मिमी पावसाची नोंद झाली असून, या हंगामातील सर्वाधिक पावसाची नोंद बुधवारी रात्री झाली आहे. पावसाचा वेग इतका प्रचंड होता की, अवघ्या अर्ध्या तासातच शहरातील प्रत्येक भागातील रस्त्यांवरील गटारी ओव्हर फ्लो होऊन रस्त्यांना नाल्यांचे स्वरूप प्राप्त झाले होते.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचे पुन्हा कमबॅक झाले असून, दोन दिवसांपूर्वी चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टी झाल्यानंतर आता जळगाव शहर परिसरातदेखील जोरदार पाऊस झाला. बुधवारी सायंकाळी ५ वाजेपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. ५ वाजता पाऊस झाल्यानंतर पावसाने एक-दीड तास विश्रांती घेतली. मात्र, त्यानंतर सायंकाळी ७ वाजेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्री ९.३० वाजेपर्यंत पावसाचा वेग जोरदार असल्याने जनजीवनावर मोठा परिणाम झाला.
हॉकर्स व खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे हाल
रात्री ७ पासून पावसाचा जोर वाढल्यानंतर रस्त्यांवरून पाणी वाहू लागले. तसेच अनेक ठिकाणी तर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. गोलाणी मार्केट, नवीपेठ, आकाशवाणी चौक, प्रभात चौक, ख्वॉजामिया चौक, बजरंग बोगदा परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना वाहने चालविताना चांगलीच कसरत करावी लागली. त्यात रस्त्यावर दुकाने थाटलेल्या हॉकर्स व खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे या पावसामुळे चांगलेच हाल झाले. अनेक विक्रेत्यांचे खाद्यपदार्थ पावसामुळे खराब झाले.
रस्तेही उखडले
अमृत अंतर्गत खोदकाम केलेल्या चाऱ्यांमध्ये दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र, बुधवारी झालेल्या पावसात अनेक भागामधील या चाऱ्यांमधील करण्यात आलेले दुरुस्तीच्या कामाचे पितळ या पावसात उघडे पडले. नवसाचा गणपती मंदिर परिसर, एस.के. ऑईल मील परिसरासह अनेक ठिकाणी खडी उखडून पडून रस्त्यांवर खड्डे तयार झाले होते.
खड्डे चुकविताना वाहनधारकांची कसरत
बुधवारी रात्री पाऊस झाल्यानंतर रात्री ११ नंतर पावसाचा जोर कमी झाला होता. त्यानंतर सकाळीदेखील पाऊस गायब झाला होता. मात्र, रात्री झालेल्या पावसामुळे अनेक भागातील रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचले होते. त्या पाण्यामुळे वाहनधारकांना खड्ड्यांमधील पाण्याचा अंदाज येत नसल्याने वाहनधारकांना खड्डे चुकविताना चांगलीच कसरत करावी लागली.
दोन दिवसात १०० मिमी पावसाची नोंद
शहरात गेल्या दोन दिवसात एकूण १०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. जळगाव शहरासह परिसरातील गावांमध्येदेखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक शेतांमध्ये पाणी साचले आहे. यामुळे कापसाचे नुकसान होण्याची भीती आहे. यासह सोयाबीनलादेखील मोठा फटका बसण्याची भीती आहे. मंडळनिहाय दोन दिवसात झालेल्या पावसाची नोंद
जळगाव - १००.१ मिमी
आसोदा - ७६.३
पिंप्राळा - ६१.८
नशिराबाद - ७३.१
म्हसावद - ६५.८
भोकर - ३४.१