लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आरोग्य विभागाकडून २०१९ च्या जाहिरातीनुसार भरती प्रक्रिया राबवायची असून ४ टक्के दिव्यांगांसाठीच्या पदांसाठी जाहिरात काढायची आहे. मात्र, ऐन या धावपळीत आरोग्य विभागात मनुष्यबळ कमतरतेचा मुद्दा गंभीरतेने समोर आला आहे. त्यातच जिल्हा आरोग्य अधिकारी वैद्यकीय कारणास्तव रजेवर असल्याने या प्रमुख पदाच्या पदभाराचाही तिढा निर्माण झाला होता, अखेर धरणगाव वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय सोनवणे यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात हा पदभार सोपविण्यात आला आहे.
आरोग्य विभागातील रिक्तपदांमुळे प्रशासकीय कामात अडसर येत असल्याचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होत आहे. आरोग्य विभागातील दोन कर्मचाऱ्यांवर नुकतीच निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या जागी पर्यायी कर्मचाऱ्यांना पदभार सोपविण्यास उशिरा झाल्याने त्यातच भरती प्रक्रियेची जाहिरात लवकर काढण्याच्या सूचना असल्याने अखेर या विभागात धावपळीचे वातावरण सुरू झाले आहे. त्यामुळे या विभागाला तातडीने कर्मचारी द्यावेत, अशी मागणी समोर येत आहे. शिवाय आहे त्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार असल्याचे चित्र आहे.
प्रभारीपदाचा असाही तिढा
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार हे वैद्यकीय कारणास्तव रजेवर गेले आहेत. मात्र, त्यांच्या जागी प्रभारी पदभार कोणाकडे सोपविण्यात आलेला नव्हता, अन्य काही वरिष्ठ डॉक्टरांनी हा पदभार घेण्यास थेट नकार दिला, शिवाय स्थायी समितीच्या सभेत अनेक डॉक्टर किंवा आरेाग्य सेवकांनी मुख्यालयी न थांबता फिल्डवर काम करावे हा मुद्दा समोर आल्यानेही हा पदभार नेमका द्यावा कोणाकडे हा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला होता. अखेर ज्येष्ठतेनुसार डॉ. संजय सोनवणे यांच्याकडे हा पदभार सोपविण्यात आला आहे.