सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील धर्मराज ठाकूर (वय १७,रा. गणेशवाडी) हा अल्पवयीन मुलगा ३१ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता त्याच्या घरासमोर उभा असताना भूषण माळी व पवन बाविस्कर तेथे आले व मागे झालेले भांडण आपण मिटवून टाकू असे म्हणत स्वप्नील यास दुचाकीवर बसण्यास सांगितले, त्यावर त्याने नकार दिला असता भूषण याने जबरदस्तीने दुचाकीवर बसविले तर पवन याने चॉपर लावून पळवून नेत स्मशानभूमीजवळील पांचाळ गल्लीत चौघांनी ‘आम्ही एरियाचे दादा आहोत, तू आमच्या नादी लागू नको, तुला महागात पडेल’ अशी धमकी देत भूषण याने डोक्यात फरशी मारून गंभीर दुखापत केली तर इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. या घटनेनंतर जखमी स्वप्नील याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, यातील भूषण याच्याविरुद्ध यापूर्वी एमआयडीसी पोलिसात ४ तर जिल्हापेठला ३ असे सात गुन्हे असून आकाश याच्याविरुद्धही एक गुन्हा दाखल आहे. पवन याच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.
मध्य प्रदेशात लागला सुगावा
गुन्हा घडल्यानंतर आकाश हा एकटाच पोलिसांच्या हाती लागला होता तर तिघे जण फरार झाले होते. भूषण व पवन हे दोघं मध्य प्रदेशातील शहापूर येथे नातेवाइकांकडे असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी मिलिंद सोनवणे, सुधीर साळवे व विजय बाविस्कर यांचे पथक रवाना केले. या पथकाने शनिवारी दोघांच्या मुसक्या आवळल्या. तपासाधिकारी अतुल वंजारी यांनी रविवारी न्यायालयात हजर केले असता न्या.जे.जे. कांबळे यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे ॲड.एस.सी. गावीत यांनी बाजू मांडली.