लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मित्राच्या घरी जात असलेल्या सोनू सुरेश चव्हाण (वय २५) व दीपक भोसले (रा. गेंदालाल मिल) या दोघांवर डबल भेजासह तिघांनी मोबाइल हिसकावून घेत त्याच्यावर तलवारीने हल्ला करून डोक्यात फरशी घातल्याची घटना ६ मे रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. शनिवारी उपचारानंतर तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेंदालाल मिल येथे राहणारा सोनू चव्हाण हा तरुण महापालिकेत सफाई कामगार म्हणून कामाला आहे. ६ मे रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास सोनू हा त्याचा मित्र प्रकाश भोसले याच्या घराकडे जात होता. यावेळी जुबेर ऊर्फ डबल भेजा याने सोनू याला मोबाइल मागितला व परत दिला नाही. मोबाइल परत दे नाही तर पोलिसांत तक्रार देईल, असे सोनू याने सांगितले असता, त्याचा राग आल्याने जुबेर याने शिवीगाळ करत सोनू चव्हाण याच्या डोक्यात फरशी मारली व जुबेर पसार झाला. याबाबत पोलिसांत तक्रारीसाठी सोनू हा त्याचा मित्र दीपक भोसले याच्यासोबत जात असताना रस्त्यात जुबेर याच्यासह त्याचे दोन्ही भाऊ रॅन्चो व फारुक हे तलवार घेऊन गेले आले. फारुक याने लोखंडी रॉड तर रॅन्चो याने तलवारीने सोनू याच्यासह त्याचा मित्र दीपक यास जबर मारहाण केली. मारहाणीत दीपकला डोक्यात गंभीर दुखापत झाली. हल्ला केल्यानंतर तिघेही पळून गेले. मनोहर भोसले व हरीश भोसले या दोघांनी सोनू व दीपक यास डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले. शनिवारी रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर सोनू चव्हाण याने दिलेल्या फिर्यादीवरून जुबेर ऊर्फ डबल भेजा, रॅन्चो व फारुक यांच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास रवींद्र पाटील करीत आहेत.