नंदुरबार : दुष्काळाने होरपळणा:या जिल्ह्यातील विविध लघु प्रकल्पांमधील जलसाठा आजच्या स्थितीत निम्म्यावर आला असून, अध्र्या डझनपेक्षा जास्त प्रकल्पांनी तर तळ गाठला आहे. यामुळे आगामी सात महिने कसे निघतील, असा प्रश्न संभाव्य पाणीटंचाईच्या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून अनियमित व कमी पाऊस होत आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर व धडगाव हे तीन तालुके दुष्काळी होते. यावर्षीदेखील पाऊस कमी झाल्याने खरिपाचे पूर्णत: नुकसान झाले आहे. यानंतर पावसाने तब्बल 40 दिवस ओढ दिली आणि थोडी फार जी काही पिके हातात येणार होती तीही गेली. यामुळे शेतकरी हतबल झालेला असताना आता दुसरीकडे पाणीटंचाईचा सामना शेतक:यांना करावा लागणार आहे. शासकीय आकडेवारीनुसार पाऊस 86 टक्के दिसत असला तरी त्यात कोणतेही सातत्य राहिले नाही. त्यातच जिल्ह्यातील एकही लघु वा मध्यम प्रकल्प यंदा पूर्ण क्षमतेने भरला नाही. गेल्या दोन-तीन वर्षापासून कोणताही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याचे जिल्हावासीयांनी अनुभवले नाही. पावसाळ्याला अजून सहा महिने बाकी आहेत. परंतु गेल्या दीड महिन्यापासून कडक ऊन तापू लागले आहे. हिवाळा असतानाही हिवाळ्यासारखे वातावरण जाणवत नाही. सकाळी अकरानंतर तर सध्या उन्हाळा आहे की काय, असे वातावरण असते. दिवसेंदिवस तापणा:या उन्हाचा फटका पाण्याचे बाष्पीभवन होण्यावर होत आहे. विविध प्रकल्पांमधील पाणीसाठाही कमी होऊ लागला आहे. जिल्ह्यात 37 लघु प्रकल्प आहेत. यातील अर्धा डझन प्रकल्पांमध्ये पाणी असूनही नसल्यासारखेच आहे. त्यातील खडकी प्रकल्पात 28 टक्के, खेकडा 32, मुगधन 33, नावली 6, सोनखडकी 7, सुलीपाडा 4, पावला 31, वावद 12, महूपाडा 35, गढावली प्रकल्पात 28 टक्के जलसाठा शिल्लक आहे. याशिवाय हळदाणी लघु प्रकल्पात 63 टक्के साठा शिल्लक आहे. तसेच खोकसा 64, मेंदीपाडा 46, रायंगण 71, विसरवाडी 95, धनीबारा 63, खोलघर 99, कोकणीपाडा 43, शनिमांडळ 96, ठाणेपाडा (2) 66, ठाणेपाडा (1) 89, वसलाय 55, दुधखेडा 49, खापरखेडा 89, कोंढावळ 72, राणीपूर 59, शहाणे 47, खडकुना 64, पाडळपूर 85, रोझवा 88, सिंगसपूर प्रकल्पात 90 टक्के जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील रंगावली या मध्यम प्रकल्पात 98.45 टक्के, दरा मध्यम प्रकल्पात 97.62, तर शिवण मध्यम प्रकल्पात 41.11 टक्के जलसाठा शिल्लक आहे.
प्रकल्पांतील साठा निम्मेच
By admin | Updated: November 23, 2015 00:08 IST